प्रत्येक पोलिसाचे नेतृत्व गुण विकसित व्हावेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2016 01:39 AM2016-11-06T01:39:09+5:302016-11-06T01:39:09+5:30
कुठे चोरी तर कुठे हत्या, तर कुठे लैंगिक अत्याचाराची घटना, अशा अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी २४ तास सतर्क राहताना पोलिसांच्या मानसिकतेचा विचार कुठेच होताना दिसत
कुठे चोरी तर कुठे हत्या, तर कुठे लैंगिक अत्याचाराची घटना, अशा अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी २४ तास सतर्क राहताना पोलिसांच्या मानसिकतेचा विचार कुठेच होताना दिसत नाही. शारीरिक स्वास्थ्या बरोबरच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्यास, येणाऱ्या संकटाचा सामना करणे अधिक सोपे जाईल, तसेच आॅन ड्युटी २४ तास राहणाऱ्या प्रत्येक पोलिसातील नेतृत्वगुणाला पोषक वातावरण मिळाल्यास याचा नक्कीच फायदा पोलीस दलाला होणार आहे. या गोष्टी सत्यात उतरण्यासाठी आॅन ड्युटी २४ तास राहणाऱ्या पोलिसाचे नेतृत्व गुण विकसित करत, त्यांना मानसशास्त्र शिकवणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत दक्षिण प्रादेक्षिक विभागाचे अपर आयुक्त प्रताप दिघावकर यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफीटेबल’ अंतर्गत व्यक्त केले.
उपनिरीक्षकापासून ते अपर पोलीस आयुक्तपदापर्यंतचा आपला प्रवास कसा आहे?
‘फक्त काही लोक पैशासाठी काम करतात, पण लाखो जण आपले समाधान, साक्षात्कार, स्वाभिमान आणि मोठेपणासाठी मरणालाही तयार असतात.’ फ्रान्सच्या क्रांतीचा जनक नेपोलियन बोनापार्टचे हे वाक्य मला नेहमी भावलेले आहे. नाशिकमधील बागलान तालुक्यातील निताने हे आमचे दुष्काळग्रस्त गाव. त्यामुळे विपरित परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द बालपणापासून निर्माण झाली होती. एखाद्या विषयात पूर्ण झोकून देण्याची सवय असल्याने, उपनिरीक्षक झाल्यानंतर त्यावर स्थिर न राहाता, १९८७ ला राज्य लोकसेवा आयोगाची उपअधीक्षक परीक्षेत द्वितीय आलो. पोलीससेवेत असतानाही शिक्षणाची गोडी कायम राहिल्याने पर्यावरण शास्त्र, ग्रामीण विकास, प्रदूषण नियंत्रण आणि आर्थिक व्यवस्थापन या चार विषयांत पीएच.डी घेतली. भविष्यात कृषी क्षेत्राचे अर्थकरण, या विषयात संशोधन करण्याचा विचार आहे.
पोलिसांवरील मानसिक ताणाविषयी काय सांगाल?
वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करतेवेळी शारीरिक स्वास्थ्याबरोबरच त्याचे मानसिक स्वास्थ्यही ढासळत असते. अशा वेळी त्याच्या शारीरिक ताण कमी होण्यासाठी आठ तास ड्युटीबाबत प्रयत्न सुरू आहेत. अशातच शारीरिक ताणाबरोबरच त्याचे मानसिक ताणही संतुलित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध गुन्ह्यांत तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्यासाठी त्यांना मानसशास्त्र शिकविणे गरजेचे आहे. जेणेकरून पोलिसांमधील तणाव कमी होऊन, त्याचे नियोजन कसे करावे, हे त्यांना कळेल. गुन्ह्यांचा शोध घेताना याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.
पोलिसांत कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाची आवश्यकता वाटते?
समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर राबणारा पोलीस कॉन्स्टेबल हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वरिष्ठांनी त्यांच्यावर विश्वास दाखवित त्यामधून सामुदायिक नेतृत्व तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘लॉ अँड आॅर्डर’बाबतच्या अनेक समस्या सुटतील.
आपल्या कामाचे स्वरूप कसे आहे?
पोलीस दलात नियम व शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्व जण एकाच ध्येयाने काम करीत असतात. वर्षातील १२ महिने व दिवसातील २४ तास समाज व सभोवतालच्या परिस्थितीला सामोरे जावा लागणारा हाच एकमेव घटक आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेचा विचार करून कामाला प्राधान्य द्यावे लागते. मी माझ्या अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. त्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करत त्यांच्या अधिकारांची जाणिव करून दिली, याच त्रिसूत्रीवर मी भर देतो. कनिष्ठ अधिकारी, कॉन्स्टेबलला काम करण्याची संधी देणे, त्यासाठीचे त्यांना अधिकार देताना जबाबदारीची जाणीव करून दिल्यास तो उत्तमप्रकारे काम करू शकतो.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत?
लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस मर्यादित असल्याने, आम्ही आमचे ‘आईज अँड इअर्स’ तयार केले आहेत. यातून दक्षिण विभागातील विविध १६ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ हजार ६५२ जण जोडले गेले आहेत. त्यामध्ये मौलवी, पुजारी, विक्र्रेते अशा विविध घटकांतील व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्याशी दर पंधरा दिवसांतून पोलीस ठाण्यात बैठक घेतली जाते. त्याचप्रमाणे, हद्दीतील प्रत्येक शाळा/ महाविद्यालयासाठी एक अधिकारी निश्चित करून ठरावीक दिवसांनी तेथे भेट देऊन माहिती घेत असतो. ही मंडळी पोलिसांचे ‘डोळे व कान’ बनून त्या-त्या भागातील सद्यपरिस्थिीचे अवलोकन करतात. एखादी घटना घडण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध घातला जातो. त्यामुळे विभागातील ५० ते ५५ टक्के गंभीर गुन्हे कमी झाले आहेत.
‘एक पोलीस एक गुन्हेगार’ या संकल्पनेमुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास कशी मदत झाली ?
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी बनवून एका अधिकाऱ्यांवर एका गुन्हेगाराची जबाबदारी दिली आहे. संबंधित व्यक्ती सध्या काय करते, कोणाच्या संपर्कात आहे, याची माहिती घेऊन त्यालाही ठरावीक दिवसांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागते. त्यामुळे तो सध्या काय करतो, याची इत्थंभूत माहिती मिळते. त्याचबरोबर, पोलिसांची आपल्यावर नजर असल्याची जाणीव असल्याने त्यांच्यावर धाक राहतो. याबरोबरच हद्दीतील प्रत्येक हाउसिंग सोसायटी, वरिष्ठ नागरिक, भाडेकरू, एकटे वास्तव्य करणारे वृद्ध मंडळी, वाहन चालक, सराफ व्यवसायिक आदींची पोलीस ठाण्यानिहाय स्वतंत्र यादी बनविली आहे. प्रत्येक पोलिसाला एकाची जबाबदारी सोपविली असून, ते नियमितपणे त्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे प्रत्येक घडामोडीवर लक्ष राहते. शिवाय त्यांचे नेतत्व गुणदेखील समोर येत आहेत. अशात प्रत्येकाने जरी लक्ष ठेवल्यास गुन्ह्यांवर आळा घालण्यास मदत होईल.
मुंबई नेहमीच हाय अॅलर्टवर असते. अशातच तुमच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशील, तसेच महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेबाबत काही विशेष उपाययोजना राबविल्या आहेत का?
महत्त्वाची ठिकाणे व संवेदनशील भागात विशेष बंदोबस्त आहे. त्याचप्रमाणे, या ठिकाणी नियमित गस्त ठेवण्यात आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुरक्षेचा वेळोवेळी आढावा व त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल केला जात आहेत. त्याचबरोबर, राज्य व केंद्रातील अन्य सुरक्षा एजन्सीच्या संपर्कात राहून अपडेट माहिती घेऊन सतर्कता बाळगली जात आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने आपल्या शेजाऱ्यावर लक्ष ठेवल्यास दीड कोटी मुंबईवर तीन कोटी डोळे राहतील आणि त्याबाबतीत वेळीच पोलिसांना कळविल्यास शहराची सुरक्षा खऱ्या अर्थाने वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
फसवणूक, लुटमारीच्या घटनांना कसा आवर घालता?
राज्यासह देशातील विविध भागांतून मुंबईत येणारे नागरिक, ग्रामस्थ बहुतांशपणे विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यांमधून या ठिकाणी उतरतात. शहराशी अपरिचित असल्याने त्यांना पोलीस असल्याची बतावणी करून रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने लुबाडणे, बॅग हिसकावून घेण्याचे प्रकार घडतात. त्याला प्रतिबंधासाठी पोलिसांकडून लाउड स्पीकर लावून, वारंवार सावधानता बाळगण्याचे आवाहन केले जाते. त्याचबरोबर, साध्या वेशात गस्त ठेवल्याने अशा घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.
तंटामुक्त गावासाठी तुम्ही राबविलेल्या उपक्रमाबाबत सांगा.
रायगड जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक असताना, राज्य सरकारच्या तंटामुक्त गाव योजनेतर्गंत ८० टक्के गावे तंटामुक्त घोषित झाली होती. त्या वेळी आपण एक ग्रामपंचायत हद्दची जबाबदारी व त्याचे नेतृत्व एका पोलिसाकडे विश्वासाने सोपवित काम करून घेतले. ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने रायगड जिल्हा पहिला आला होता. त्यामुळे २०१० मध्ये न्यूयॉर्कला झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये (युनो) याविषयी भाषण करण्यास निमंत्रित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, वृक्ष लागवडीबाबतच्या कार्याबाबत २००१ मध्ये इंदिरा प्रियदर्शनी हा राष्ट्रीय स्तरावरील वृक्षमित्र बहुमानाने सन्मानित करण्यात आले. त्यासाठी ९० हजार वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, तर कोल्हापुरात अपर अधीक्षक म्हणून वृक्ष लागवडीबाबत केलेल्या कामामुळे कोल्हापूर पोलिसांना २००३ मध्ये वनश्री पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
तुम्ही कर्तव्य बजावत असताना जोपासलेले छंद कोणते?
दैनंदिन कामाच्या व्यापातून वाचन, अभ्यास सुरू असतो. माझ्या स्वत:च्या ग्रंथालयात जगभरातील विविध मान्यवरांची विविध विषयांवरील सहा हजारांवर पुस्तकांचा संग्रह आहे. व्यायामाची आवड पहिल्यापासून कायम आहे. गावी सुट्टीवर असल्यास अजूनही शेतात जाऊन शेतीचे काम करण्यात समाधान वाटते.
पनवेल येथील मेगा टाउनशिपची सद्यस्थिती काय आहे?
दिवगंत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या विशेष पुढाकारामुळे पोलिसांना स्वस्तात घरे उपलब्ध होण्यासाठी मेगा टाउनशिप हा मोठा गृहपक्रल्प उभारला जात आहे. गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नानंतर, त्यासाठी ११४ एकर भूखंड हस्तांतरित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार व सर्व नियमांची अंमलबाजवणी करून खरेदी व्यवहार पूर्ण झाला आहे. प्रकल्पासाठी सर्व विभागांकडून ‘एनओसी’ मिळाल्या असून, येत्या आठ दिवसांत प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाईल. यातून सुमारे दहा हजार घरांची निर्मिती होणार असून, सरासरी १५ लाखाला ७५० ते ८०० चौरस फुटांची घरे कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील. पोलिसांसाठीचा देशातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा गृहप्रकल्प असणार आहे.
(शब्दांकन : जमीर काझी)