दोन वर्षात राज्यातील एक हजारांवर पोलीसांवर हल्ले
By admin | Published: September 9, 2016 07:05 PM2016-09-09T19:05:43+5:302016-09-09T19:05:43+5:30
ज्यातील तब्बल एक हजार २९ पोलीस दादांवर राजकीय पदाधिकारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ले केल्याचे समोर आले.
Next
style="text-align: justify;">सचिन राऊत, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ९ - जनतेच्या संरक्षणासाठी स्वत:च्या जिवाचीही पर्वा न करता रात्रंदिवस कर्तव्यावर असलेल्या राज्यातील तब्बल एक हजार २९ पोलीस दादांवर राजकीय पदाधिकारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ले केल्याचे समोर आले. २०१४ ते जुलै २०१६ या कालावधीत राज्य पोलीस दलातील एक हजार २९ पोलीस कर्मचा-यांवर हल्ले केल्यानंतर पोलिसांनी एक हजार ६५५ आरोपींना अटक केली आहे.
राज्याची सुरक्षा व्यवस्था असलेल्या पोलीस खात्याला कायमस्वरूपी गृह मंत्री नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह विभागाचा कारभार मोठ्या मेहनतीने हाकत असले तरी गुन्हेगारी मात्र प्रचंड वाढत आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात दिवसाआड एक खून होत असल्याचे समोर येत आहे. आधीच राज्याच्या पोलीस खात्यात रिक्त पदांचा अनुशेष प्रचंड असल्याने पोलिसांवर कामाचा ताणही भरमसाठ आहे.
यातच नागरिकांच्या सुक्षेसाठी दिवस-रात्र झटणाºया पोलीस दादाच्या खाकी वर्दीवरच आता गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हात घातल्याने खाकीची अस्मिता पणाला लागली आहे. राज्यातील नऊ पोलीस आयुक्तालयामधील गत अडीच वर्षांत ५३६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांवर हल्ले करण्यात आले असून, याचे सर्वाधिक प्रमाण मुंबईत, तर सर्वात कमी हल्ले सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी झालेले आहेत.
राज्यातील नऊ परिक्षेत्रात ४९३ पोलीस अधिकारी कर्मचा-यांवर हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण कोल्हापूर परिक्षेत्रातील असून, सर्वात कमी प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे. राज्यात एक हजार २९ पोलिसांवर हल्ले झाल्यानंतर पोलीस खात्याने यामधील ९८० गुन्ह्यांचा तपास करून ते उघड केले आहेत. या प्रकरणांमधील तब्बल एक हजार ६५५ आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिक प्रमाणात असल्याची माहिती आहे.
राजकीय पदाधिकारी आरोपी
पोलिसांवर हल्ले करण्यामध्ये जास्त प्रमाण राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासोबतच ट्रकचालक, ऑटोचालक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी पोलिसांना मारहाण केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यातील पोलिसांवर आता लागोपाठ हल्ले होत असल्याने खाकीचीच सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-कोल्हापुरात सर्वाधिक हल्ले
राज्यातील पोलिसांवरील हल्ले कोल्हापूर परिक्षेत्रात सर्वाधिक झाले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातील १०२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांवर हल्ले करण्यात आले आहेत. या प्रकरणातील २२२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर आयुक्तालयाच्या ठिकाणावर मुंबई शहरातील पोलिसांवर सर्वाधिक हल्ले करण्यात आले असून, ही आकडेवारी २१७ अशी आहे. २१७ पोलिसांवर हल्ले झाल्यानंतर यामधील २९७ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.