दररोज ५ लाख लिटर सांडपाणी होणार शुद्ध, पुण्यात साकारला पहिला पर्यावरणपूरक प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 03:23 PM2017-10-09T15:23:59+5:302017-10-09T15:24:34+5:30
परदेशात सांडपाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात असताना आपल्याकडे मात्र त्याबाबत उदासीनता दिसून येते.
पुणे : परदेशात सांडपाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात असताना आपल्याकडे मात्र त्याबाबत उदासीनता दिसून येते. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प सहकारनगर येथील वसंतराव बागुल उद्यानात साकारण्यात आला आहे. दररोज ५ लाख लिटर सांडपाणी शुद्ध करून ते उद्याने, स्वच्छतागृहे व नवीन बांधकामांसाठी वापरले जाणार आहे.
उन्हाळ्यामध्ये पाण्याची निकड मोठ्या प्रमाणात भासण्यास सुरूवात झाल्यानंतर यंत्रणांना जाग येऊन पाणी बचतीचे संदेश नागरिकांना दिले जातात. मात्र पाणी टंचाईच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी फारसे प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत. यावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरणाचा पहिला प्रकल्प सहकारनगर येथील वसंतराव बागुल उद्यानात उभारण्यात आला असल्याची माहिती माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागूल यांनी दिली.
आबा बागूल यांनी सांगितले, प्रभागातील सांडपाणी एकत्र करून ते प्रकल्पाच्या ठिकाणी आणले जाणार आहे. या ठिकाणी या पाण्याचा रंग, दुर्गंधी, वास व जंतू नष्ट करून ते पुनर्वापरासाठी उपलब्ध होणार आहे. सांडपाणी बायो मीडिया फिल्टर बेडवर सोडून शुद्ध केले जाणार आहे. यामध्ये रसायनांचा कोणताही वापर केला जाणार नाही. या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात दररोज ५ लाख लिटर सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया होणार आहे. दुस-या टप्प्यात ही क्षमता १० लाख लिटरपर्यंत वाढविली जाणार आहे.
ग्रे वॉटर प्रकल्प उभा करण्यासाठी गेल्या ७ वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता, अखेर त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकल्पासाठी दिड हजार इमारतींमधील अंघोळ व स्वयंपाकाचे पाणी एकत्र केले जाणार आहे. त्यासाठी अडीच किमीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे असे बागूल यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी १ कोटी ५७ लाख रुपये इतका खर्च आलेला आहे. पाण्याच्या पुनर्वापराला चालना देणा-या अशा प्रकल्पांची व्याप्ती वाढविणे पुढील काळात राबविणे आवश्यक असणार आहे.