महाराष्ट्रात दरवर्षी दोन लाख क्षयरोग्यांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 05:28 AM2018-12-09T05:28:36+5:302018-12-09T05:28:55+5:30
महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे २ लाख क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद होते, त्यामध्ये सर्वाधिक सुमारे सव्वा लाख रुग्ण शासकीय रुग्णालयात येतात.
पुणे : महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे २ लाख क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद होते, त्यामध्ये सर्वाधिक सुमारे सव्वा लाख रुग्ण शासकीय रुग्णालयात येतात. तर खासगी रुग्णालयांमधील हा आकडा ६० हजारांच्या जवळपास आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाच्या (टीबी) सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांनी दिली.
राज्य क्षयरोग कार्यालय आणि ग्लोबल हेल्थ स्ट्रॅटेजिज यांच्यावतीने आयोजित कार्यशाळेमध्ये त्या बोलत होत्या. त्यांनी ‘क्षयरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक नियोजन : महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि उपक्रम’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. जोगेवार म्हणाल्या, राज्यात दरवर्षी १ लाख ९० हजार क्षयरोग रुग्णांची नोंद होत असून त्यामध्ये १ लाख ३० हजार रुग्ण शासकीय रुग्णालयातील आहेत. राष्ट्रीय धोरणात्मक योजनेच्या माध्यमातून (एनएसपी) शासनातर्फे २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनासाठी क्रांतीकारी उपाययोजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णकेंद्री दृष्टिकोन ठेवून मदत यंत्रणा (सपोर्ट सिस्टम) तयार करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांवर नियमित उपचार आणि खर्च कमी होण्यास मदत होईल.