प्रत्येकाच्या पोटात घुसून काम करीत गेलो - सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2016 02:43 AM2016-09-04T02:43:32+5:302016-09-04T02:43:32+5:30
सोलापूरच्या ढोर गल्लीतील संभाजीरावांचा मुलगा दगडू... दोन मातांच्या कुशीत वाढला... अकालीच वडील गेले... कधी ‘बुढ्ढी के बाल’ विकून तर कधी लोकांची लेकरं सांभाळून जगण्यासाठी
सोलापूरच्या ढोर गल्लीतील संभाजीरावांचा मुलगा दगडू... दोन मातांच्या कुशीत वाढला... अकालीच वडील गेले... कधी ‘बुढ्ढी के बाल’ विकून तर कधी लोकांची लेकरं सांभाळून जगण्यासाठी धडपडत असतानाही रात्रशाळेत शिकू लागला... त्याच जिद्दीने न्यायालयात पट्टेवाला म्हणून काम करताना संगमेश्वर महाविद्यालयाच्या रंगमंचावर ‘लग्नाची बेडी’सारखी नाटकेही गाजवू लागला... त्याच रंगमंचाने दगडूचे नामाभिधान ‘सुशीलकुमार’ असे केले. शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलेले सुशीलकुमार शिंदे तब्बल चार तपाच्या देशाच्या व राज्याच्या वाटचालीचे सक्रिय साक्षीदार आहेत. अफझल गुरू आणि कसाबसारख्या अतिरेक्यांच्या फाशीची अंमलबजावणी करण्याचा इतिहास स्वत:च्या नावावर नोंद करणारे सुशीलकुमार यांची पंचाहत्तरी साजरी होत आहे... त्यांच्या वाटचालीचे साक्षीदार व मित्र ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर आणि सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद...
साखर कारखाने, सहकारी संस्था किंवा स्वत:च्या शैक्षणिक संस्थांचा मोह तुम्हाला का झाला नाही ?
ज्या वेळी मी राजकारणात आलो त्या वेळी त्या क्षेत्रामध्ये अगदी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारी मंडळी तिथे होती. साखर कारखाने असोत वा सहकारी संस्था तिथे मोठ्या संघटनात्मक जाळ्याची आवश्यकता होती, हे मी जाणले. जे काम करताहेत त्यांना मदत करणे अशीच भूमिका मी सुरुवातीपासून ठेवली. मला आठवते, इंदापूरला शंकरराव बाजीराव पाटील यांचा साखर कारखाना ज्या वेळी उभा राहिला त्या वेळी त्यांनी उद्घाटनाला मला बोलावले. त्यांनी जाहीरपणे मी कारखाना उभारण्यासाठी मदत केल्याचे तेथे सांगितले. एवढेच काय, आमच्या जिल्ह्यातील मारवाडी वकिलांच्या कारखान्याच्या उद्घाटनाला मला बोलावले आणि केलेल्या मदतीबद्दल वाकून नमस्कार करीत असताना मी अडविले.
खरे तर सरकार व पक्ष संघटनेत राहूनच जनतेची सेवा करायचे तंत्र मी पाळलेले होते. दुसरा कुठलाही मार्ग पत्करायचा नाही असे ठरविले होते. त्यामुळे मी कधीही सहकारी संस्थांच्या भानगडीत पडलो नाही. हे खरं आहे की, मी अनेक साखर कारखाने, सूत गिरण्यांना मदत केली. मी अर्थ व नियोजनमंत्री म्हणून खूप लोकांना मदत करू शकलो. यशवंतराव चव्हाणांनी ज्या तऱ्हेने हे सगळे काम आमच्यापुढे ठेवलेले होते, ते पुढच्या पिढीच्या हाती प्रशासकीय नेतृत्व म्हणून आपण करावे, अशी माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे मी मदत करत होतो.
तुम्ही राज्याचे नऊ अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केलात. पुढे मुख्यमंत्री झाल्यावरही अर्थसंकल्पावर तुमच्या पुरोगामित्वाचा प्रभाव दिसला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचे आपले धोरण किती यशस्वी झाले?
हो. मी स्वत: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निस्सीम चाहता आहे. त्यांनादेखील परदेशात जाताना शाहू महाराज, गायकवाड महाराज यांची आर्थिक मदत घ्यावी लागली होती, याची जाणीव मला आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या नावावर २५ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बाबासाहेबांचे आम्हा सगळ्यांवर अनंत उपकार आहेत. या निर्णयामुळे खूप विद्यार्थी परदेशात शिकायला गेले, त्यांची कुटुंबे सुधारली. ती सुधारली म्हणजे समाजालादेखील स्थैर्य मिळते. जातीसंस्था नष्ट करण्याचे शिक्षण हेच मोठे माध्यम आहे. आज माझ्याजवळ आकडेवारी नाही, परंतु अनेक परदेशात शिकून आलेली मुले आज जेव्हा भेटतात तेव्हा आनंद वाटतो.
माझ्या अर्थसंकल्पात देशात पहिल्यांदाच जादूवाले, सापवाले आणि अशाच लोकांसाठी मी ४०० कोटींची तरतूद केली होती. मला आणखी संधी मिळाली असती तर सुरभा टिपणीसांच्या नावेही एक योजना सुरू करण्याचा माझा मानस होता. कारण चवदार तळ्याची सुरुवात त्यांच्यामुळे झाली होती.
आपण मुख्यमंत्री पदापासून ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंतची महत्त्वाची पदे सांभाळली, तुम्ही ती सांभाळण्यात कुठे कमी पडला असे कधी वाटते का?
मुळीच नाही! उलट राज्यात असो वा केंद्रात मी जिद्दीने प्रभावी काम करू शकलो याचा मला आनंद वाटतो. समाजाच्या शेवटच्या घटकाला अर्थसंकल्पात आणण्याचे काम देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम केले. २००६ साली ज्या वेळी मी केंद्रीय ऊर्जामंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली तेव्हाही ते एक आव्हान म्हणूनच! देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून २००६ सालापर्यंत देशात १ लाख २३ हजार मेगावॅट एवढीच ंआपली वीजनिर्मिती क्षमता होती. मी ज्या वेळी ऊर्जा खात्याचा पदभार सोडून गृहमंत्री झालो त्या वेळी वीजनिर्मिती क्षमता २ लाख २७ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली होती. देशात झालेल्या पंचवार्षिक योजनांमध्ये जे काम झाले नव्हते ते काम माझ्या कार्यकाळात वीजनिर्मितीबाबतीत झाले. त्या वेळी अर्थमंत्री असलेले प्रणव मुखर्जी यांनी संसदेत जाहीरपणे माझे कौतुक केले होते याचा मला खूप आनंद होतो. मी ज्या-ज्या खात्याचे काम सांभाळले त्या खात्याचे काही ना काही माझ्या गावासाठी आणण्याचा माझा सतत प्रयत्न राहिला. ऊर्जा खाते व
पर्यायाने एनटीपीसी माझ्या अखत्यारीत असताना १५ हजार कोटींचा एनटीपीसीचा दक्षिण भारताला जोडणारा पॉवर ग्रीडचा प्रकल्प आणला. सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा करणारी समांतर पाइपलाइन एनटीपीसीच्या माध्यमातून मंजूर केली व आता ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. माझ्याकडे गृहखाते आले तेव्हा सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) व सशस्त्र सीमा बल (एसएसबी) अशी दोन युनिट्स सोलापूर जिल्ह्यात आणली.
...तरीही नरेंद्र मोदी सोलापुरात येऊन ‘सुशीलकुमार शिंदेने सोलापूरके लिए क्या किया?’ असा सवाल करून गेले होते...
राजकारणात असे प्रश्न विचारले जातातच! मोदी सोलापुरात येऊन नुसत्या गप्पा मारून गेले. हातमागधारकांचा कपडा पोलीस शिपायांच्या गणवेशासाठी देण्याची भाषा त्यांनी त्या वेळी केली होती. आता कोठे आहेत ते?
सुरुवातीपासूनच केवळ विकासाचे राजकारण मी करीत आलो आहे. एका जमान्यात आमच्या सोलापूरजवळील बाळे या गावात पूल नसल्यामुळे तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई तब्बल दीड दिवस अडकून पडले होते. प्रथम मी तेथे पूल बांधला. आजचे चित्र तर सर्वांनाच ठाऊक आहे. पुणे, हैदराबाद आणि विजापूरशी सोलापूरला मी चौपदरी रस्त्याने जोडू शकलो. एका जिल्ह्यासाठी सोलापूर विद्यापीठ देऊ शकलो याचे मला समाधान आहे. सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी खात्रीचा स्रोत नव्हता, म्हणून १९८५ साली उजनी धरणातून शहराला पिण्याचे पाणी पुरविणारी पाइपलाइन योजना मी मंजूर करून घेतली. त्यामुळे सोलापूर पिण्याच्या पाण्याच्या संकटातून मुक्त झाले. आता एनटीपीसीची दुसरी पाइपलाइन पूर्णत्वास जात असल्याने भविष्याचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. १९६९ साली माझा आमच्या ढोर गल्लीत सत्कार झाला होता. आज राष्ट्रपतींच्या हस्ते माझा सत्कार होतोय. ढोर गल्लीतला अर्ध्या चड्डीवर फिरलेला मुलगा एवढा मोठा झाला तो सोलापूरकरांमुळेच. हीच कृतज्ञ भावना माझ्या मनात आहे.
आपण ‘मवाळ’च राहिलो, ‘आक्रमक’ न झाल्यामुळे राजकारणात अनेकदा तोटा झाला असा तुम्हाला कधी पश्चात्ताप वाटतो का ?
(खळखळून हसत...) लहानपणापासून दोन मातांच्या छत्राखाली दारिद्र्यात वाढलो. तेव्हापासूनच असुरक्षिततेच्या भावनेचा पगडा माझ्या मनावर
बसला. तोच पगडा राजकारणात आल्यानंतरही कायम राहिला.
त्यामुळे विषय कुठलाही असो सकारात्मक राहणे व वाद न घालणे आणि सामोपचाराने पुढे जाणे मी पसंत केले. अगदी सुरुवातीपासून मी सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या
पोटात घुसून काम करीत गेलो. कामाचे फळ मिळत गेले. अपेक्षा कधी ठेवली नाही ! कदाचित माझ्या मवाळ स्वभावामुळे काही नुकसान झाल्यासारखे तुम्हाला वाटत असेल. मला मात्र तसे वाटत नाही. त्याचा पश्चात्ताप होण्याचा प्रश्नच नाही.