देशात दरदिवशी जातोय एका बिबट्याचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 06:34 AM2019-01-23T06:34:27+5:302019-01-23T06:34:38+5:30
वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून या संघर्षात देशात दररोज एका बिबट्याला आपला जीव गमवावा लागत आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून या संघर्षात देशात दररोज एका बिबट्याला आपला जीव गमवावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जंगलावर होत असलेल्या मानवी अतिक्रमणामुळे बिबटे अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढत असले तरी, दुसरीकडे बिबट्यांची संख्याही घटत चालली आहे. गेल्या दोन वर्षांत भारतात एकूण ८८६ बिबटे मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. वन्यजीव विभागाकडे असलेल्या माहितीनुसार १९९८ मध्ये भारतात बिबट्यांची संख्या सुमारे ४५००० इतकी होती; मात्र २०१५ मध्ये केवळ ७९१० इतकेच बिबटे शिल्लक राहिले आहेत. गेल्या १७ वर्षांत बिबट्यांच्या संख्येत सुमारे ८२ टक्के इतकी घट झाली आहे. अकोल्यात सलग दोन दिवसांत दोन बिबट मृतावस्थेत आढळले, तर मंगळवारी वाहनाच्या धडकेत नाशिकमध्ये एका बिबट्याचा मृत्यू झाला.
मुंबई, नाशिक व इतर भागात बिबट्यांच्या अधिवासावर काँक्रिटचे जंगल उभे राहिल्यामुळे बिबट्यांनी शहरांकडे धाव घेतली आहे. मुंबईत आरे कॉलनी, राजीव गांधी राष्टÑीय अभयारण्य परिसरात बिबट्यांचा सहज वावर आपल्याला दिसून येतो. नाशिक विभागात तर बिबट्यांचा जुना अधिवास संपल्यामुळे पर्याय म्हणून बिबट्याने उसाच्या शेतात धाव घेतली आहे. मानवी सहजीवनात बिबट्या रमला असला तरी मानवी हल्ल्यामध्ये वाघांच्या
तुलनेत बिबट्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, बिबट्याची मानसिकता जाणून घेणारे कुठलेच तंत्रज्ञान आजवर विकसित झालेले नाही. बिबट्याच्या नैसर्गिक राहणीमानावर फरक पडला की त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. म्हणूनच हल्ल्याच्याही घटना वाढत आहेत; मात्र बिबट्यांचा स्वभाव माणसाला मारणे
नसून, त्याला टाळणे आहे. ‘सेल्फ प्रोटेक्शन’ हा प्रत्येकाचा स्वभाव असतो. त्यामुळे ते स्वरक्षणासाठी हल्ला करतात.
२०१८ मध्ये एकूण २६० बिबट मृत पावले. त्यात ९० बिबट्यांची शिकार करण्यात आली, तर २२ बिबटे गावकऱ्यांनी मारले. उर्वरित बिबट्यांच्या मृत्यूबाबत थांगपत्ता नाही.
>50 प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी देशात
उभारले गेले आहेत; मात्र बिबट्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. बिबट्याची जगण्याची जिद्द भरपूर आहे. पक्षी खाऊन, कुत्रे खाऊन म्हणजे कोणत्याही परिस्थितीत
तो जगतो, हे विशेष!
>वाढती शिकार, संवर्धनाअभावी बिबट्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रानडुक्कर आणि काळवीट बिबट्याचे आवडते खाद्य आहे. म्हणून शेतकºयांना रानडुक्कर, हरीण व नीलगायींच्या त्रासापासून वाचायचे असेल, तर त्यांनी बिबट संवर्धनात हातभार लावणे आवश्यक आहे.
- यादव तरटे पाटील,
वन्यजीव अभ्यासक.