दररोज बसते माकडांची अनोखी पंगत!
By admin | Published: September 19, 2016 02:38 AM2016-09-19T02:38:18+5:302016-09-19T02:38:18+5:30
‘जिवभावे शिवसेवा’; खामगाव येथील उपक्रम; १0 किलोच्या पोळ्यांचे माकडांना होते नित्य वाटप.
गिरीश राऊत
खामगाव (जि. बुलडाणा), दि. १८ : वेगवेगळ्या पंगती पाहण्यात येतात; मात्र खामगावात दररोज माकडांची अनोखी पंगत बसते. केवळ मनुष्यालाच नव्हे तर प्राणीमात्रावर दया करणे ही धर्माची शिकवण आहे. संत एकनाथ कुत्र्याने पोळी पळविली असता, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे गेल्याची. तसेच तीर्थक्षेत्रावरून आणलेले काशीचे जल गाढवाला पाजून त्याची तृष्णातृप्ती करून ह्यजीवाभावे शिवसेवाह्णचा प्रत्यय दिला होता. अशीच ह्यजीवाभावे शिवसेवाह्ण शहरातील स्व. रामचंद छतवाणी यांचा परिवार करीत आहे.
शहरातील स्व. रामचंद उदाराम छतवाणी यांनी १९९७ पासून समाजाप्रति आपले देणं समजून काही उपक्रम सुरू केले. या उपक्रमांतर्गत दररोज १२ किलोच्या पोळ्या या परिवाराकडून तयार करण्यात येतात. यापैकी २ किलो पोळ्या गाईला ह्यगोग्रासह्ण म्हणून दिल्या जातात, तर उर्वरित १0 किलोच्या पोळ्यांचे वितरण माकडांना केले जाते. शहरातील जनुना रस्त्यावर दाट झाडी आहे. त्यामुळे या भागात या पोळ्यांचे वितरण संध्याकाळी माकडांना केले जाते. माकडांना ही वेळ माहिती असल्याने माकडंसुद्धा छतवाणी यांची वाट पाहत असतात. छतवाणी यांची माकडांनासुद्धा ओळख झाली असून, छतवाणी यांचे आगमन झाल्याबरोबर माकड दररोजच्या निमंत्रणाचा मानापमान न ठेवता झाडावरून उतरून खाली येऊन रांगेत बसतात. माकडांना प्रत्येकी एक याप्रमाणे पोळ्यांचे वाटप करण्यात येते. दुसर्याला पोळी वाटप करीत असताना कोणतेही माकड दुसर्या पोळीचा हव्यास करीत नाही. त्यामुळे माकडांची ही शिस्तीतील पंगत माणसांनाही लाजविणारी ठरत आहे. यासोबतच छतवाणी परिवार शहरात इतर सामाजिक बांधीलकीसुद्धा जपत आहे.
१९९९ सालापासून सामान्य रुग्णालयात दूध, पोहे वाटप करण्यात येते. मध्यंतरी आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर बिस्किट व केळीचे दर रविवारी वाटप केले जाते. १९९७ मध्ये वर्दळीच्या आठवडी बाजार चौकात जलमंदिराचे निर्माण या परिवाराने स्व.अर्जुनसेठ छतवाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केले आहे. या जलमंदिराच्या माध्यमातून २४ तास थंड पाण्याची सेवा दिली जाऊन तृष्णातृप्ती केली जात आहे.
स्व. रामचंद छतवाणी यांची शहरातील आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख होती. त्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या पश्चात त्यांची मुले अजय व सुरेंद्र, अमर तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यसुद्धा सामाजिक बांधीलकीचा हा वसा पुढे चालवित आहेत.