अकरावीमध्ये सर्वांना मिळणार प्रवेश
By admin | Published: June 22, 2016 01:12 AM2016-06-22T01:12:02+5:302016-06-22T01:12:02+5:30
पुणे व पिपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे ७३ हजार जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून
पुणे : पुणे व पिपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे ७३ हजार जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, मंगळवारपर्यंत ७२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. एकूण प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज प्राप्त झाले तरी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहान पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे २२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काही विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत. आतापर्यंत अकरावी प्रवेशासाठी ८४ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन लॉगइन केले आहे. मात्र, त्यातील ७८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला असून ७२ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला व दुसरा दोन्ही भाग भरले आहेत. त्यामुळे मंगळवारपर्यंत ७२ हजार ८८७ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत.
अकरावीच्या ७३ हजार जागांसाठी सध्या आॅनलाईन पध्दतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. तसेच इन हाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश महाविद्यालयांकडून दिले जात आहेत. मात्र, प्रवेशासाठी ७३ हजाराहून अधिक अर्ज आल्यास आपल्याला प्रवेश मिळेल का? अशी शंका पालक व विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होऊ शकते. परंतु, अर्ज करणारे सर्वच विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेणार नाहीत. काही विद्यार्थी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रास किंवा आयटीआय अभ्यासक्रमास प्रवेश घेतील. त्यामुळे अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहतील. परिणामी आॅनलाईन अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे.
नवीन महाविद्यालयांत प्रवेशाचा गोंधळ कायम
पुणे : राज्य शासनाने पुणे व पिंपरी चिंचवड येथील चाळीसहून अधिक शैक्षणिक संस्थांना चालू शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत या महाविद्यालयांचा समावेश करता येणे शक्य नाही. परिणामी नवीन महाविद्यालयांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार व त्याने दिलेल्या महाविद्यालयांच्या पसंती क्रमानुसार प्रवेश मिळणार आहे. मात्र ,राज्य शासनाने पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील काही शैक्षणिक संस्थांना चालू शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अकरावीचे सर्व प्रवेश केवळ आॅनलाईन पध्दतीनेच करावेत, असे स्पष्ट आदेश शासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांमधील प्रवेश आॅफलाईन पद्धतीने करण्यास शिक्षण विभागाकडून परवानगी दिली जात नाही. शिक्षणसंस्थाचालक गेल्या काही दिवसांपासून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात याबाबत विचारणा करण्यासाठी फेऱ्या मारत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या महाविद्यालयांमधील जागांच्या प्रवेशाचा विचार केला जाणार आहे. त्यातच जुलै-आॅगस्टमध्ये दहावीची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे जुलै-आॅगस्टच्या परीक्षेत उत्तीर्ण दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.