धार्मिक मिरवणूक काढण्याचा प्रत्येकाला अधिकार - हायकोर्ट
By admin | Published: October 27, 2016 01:03 AM2016-10-27T01:03:24+5:302016-10-27T01:03:24+5:30
भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला देश असून येथील प्रत्येक नागरिकाला त्याच्या विश्वासानुसार धार्मिक तसेच धर्माशी संबंध नसलेली मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे
नागपूर : भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला देश असून येथील प्रत्येक नागरिकाला त्याच्या विश्वासानुसार धार्मिक तसेच धर्माशी संबंध नसलेली मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले आहे. कोणालाही अशाप्रकारची मिरवणूक काढण्यापासून थांबविता येणार नाही, असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती संपूर्ण जगात साजरी केली जात आहे. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण देत मालेगाव तालुक्यातील (जि. वाशिम) पांगरी नवघरे गावात या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. याविषयी रामदास वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढताना हे मत नोंदविले. (प्रतिनिधी)