प्रत्येकाने मराठीचा आग्रह धरावा
By admin | Published: May 17, 2015 01:06 AM2015-05-17T01:06:46+5:302015-05-17T01:06:46+5:30
भाषेची नाळ संस्कृतीशी निगडित असते. आपल्या संवेदनांसह विचार मांडण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची आहे. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा आग्रह धरायला हवा,
पिंपरी : भाषेची नाळ संस्कृतीशी निगडित असते. आपल्या संवेदनांसह विचार मांडण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची आहे. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा आग्रह धरायला हवा, असे मत राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ‘मराठी संवर्धन’ या विषयावर ते बोलत होते. यमुनानगर, निगडी येथे स्पर्धा परीक्षा केंद्रात शुक्रवारी कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते झाले. प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत इंदलकर, केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मराठी माणसे आहेत. परंतु, त्यांचे वार्षिक अहवाल इंग्रजीमध्ये तयार करण्यात येतात. अनेक कारखान्यांमध्ये इंग्रजीत कारभार चालतो. बँकांमध्येही मराठीचा वापर होत नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मराठीचा वापर झाला, तरच ती अधिक समृद्ध होईल. मातृभाषा ही विचार व ज्ञानप्रक्रियेशी निगडित असल्याने महत्त्वाची आहे. आपणच आपल्या भाषेचे मारेकरी होत आहोत. जगातल्या असंख्य भाषा शिकायला हरकत नाही. मातृभाषा अनेक अर्थाने महत्त्वाची असते. मातृभाषेत व्यवहार करणे गरजेचे आहे. भाषेमध्ये सतत बदल होत आहेत. मात्र , भाषेची स्वत:ची ठेवण असते व ती कायम असते. मध्ययुगात ज्ञानवृद्धी होत नव्हती. ज्ञान जातीजातीमध्ये बंदिस्त होते. त्यामुळे साचलेपण आले होते. बाराव्या शतकातील, शिवकालीन व आताची मराठी यामध्ये बदल झालेले असले, तरी भाषेची ठेवण तीच असल्याने त्याचे संवर्धन करायला हवे. ’’
४ आयुक्त राजीव जाधव म्हणाले, ‘‘मराठी भाषेत आपण आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडतो. जगातील मोठमोठे साहित्यिक आणि संशोधक यांनी आपआपल्या भाषेमध्ये प्रभुत्व निर्माण केले. त्यामुळे आपणही मराठी भाषेचा आग्रह धरायला हवा. मराठी भाषेतील ज्ञान अफाट आहे. मराठी भाषा नष्ट झाल्यास चांगल्या साहित्याचासुद्धा नाश होईल.’’