प्रगत महाराष्ट्रासाठी सर्वांनी योगदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 06:48 AM2018-05-02T06:48:55+5:302018-05-02T06:48:55+5:30
राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. प्रगत आणि प्रभावशाली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी योगदान
मुंबई : राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. प्रगत आणि प्रभावशाली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतानाच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सरकारच्या विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव डी. के. जैन आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात आतापर्यंत ६० लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. राज्यातील ३४ जिल्हे, ३५१ तालुके, २७,६६७ ग्रामपंचायती आणि ४०,५०० गावे हागणदारीमुक्त झाल्याचेही राज्यपालांनी सांगितले. प्लॅस्टिकचा धोका लक्षात घेऊन, राज्यात प्लॅस्टिक व थर्माकॉलपासून बनविल्या जाणाऱ्या उत्पादनांची निर्मिती, विक्री व वापर, यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पर्यावरणाचे व नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण होण्यास मदत होईल. या मोहिमेत मनापासून सहभागी होण्याचे आवाहनही राज्यपालांनी या वेळी केले.
सार्वजनिक आरोग्याकडे राज्य सरकारचे विशेष लक्ष असून, येत्या महिन्यापासून, राज्यातील कर्करोग रुग्णांना जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी देण्यात येणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या दहा जिल्ह्यांत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
याशिवाय राज्यपालांनी आपल्या भाषणात शेतकरी कर्जमाफी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, तसेच राज्याच्या शीघ्र विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांचाही उल्लेख केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी व कार्याशी संबंधित ठिकाणे, तीर्थयात्रा व पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात महाडचे चवदार तळे, नाशिक येथील काळाराम मंदिर, नागपूर येथील दीक्षाभूमी, देहू रोड येथील बुद्ध विहार, सातारा विद्यालय आणि भीमा कोरेगाव येथील स्मारक स्तंभाचा समावेश असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपाल म्हणाले की, २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार बांधील आहे. राज्यभरातील जास्तीतजास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चालू वर्षात २.२६ लाख हेक्टर इतकी सिंचनक्षमता आणि पाण्याच्या साठवण क्षमता ८५३ दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढविण्याचे सरकारचे धोरण असून, काम सुरू असलेले ५० सिंचन प्रकल्प शासन प्राधान्याने पूर्ण करणार आहे. मोफत पासचे वितरण : भारतीय सैन्य दलातील हुतात्म्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे, तसेच वीरपत्नींना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या वेळी प्रातिनिधीक स्वरूपात सुषमा रोहित पाटील, सुमन एकनाथ माने, सुरेखा रामचंद्र शिंदे व सुमन श्रीधर सोनावणे या वीरपत्नींना या योजनेचे पास राज्यपालांच्या हस्ते देण्यात आले.