देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी- नयनतारा सहगल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 05:39 PM2019-01-06T17:39:50+5:302019-01-07T10:50:35+5:30

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांकडून रद्द झाल्यानंतर सहगल यांचा भाजपावर निशाणा

everyone should feel ashamed of current situation in country says nayantara sahgal | देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी- नयनतारा सहगल

देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी- नयनतारा सहगल

Next

मुंबई: साहित्य संमेलनातील भाषणात मी सद्यस्थितीवर बोलणार होते. असहिष्णुता, हिंसाचाराच्या वातावरणावर भाष्य करणार होते. त्यामुळेच मला दिलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांकडून रद्द करण्यात आलं असावं, असं प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीची लाज वाटायला हवी असं देखील सहगल म्हणाल्या आहेत. माझ्या भाषणाला मुख्यमंत्री बहुतेक घाबरले असावेत असा टोला नयनतारा सहगल यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी अचानक रद्द केलं. सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा ईमेल सहगल यांना आयोजकांकडून पाठवण्यात आला. यामुळे आश्चर्य वाटल्याचं सहगल यांनी 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं. 'माझ्या भाषणातून मी देशातील सद्यस्थितीवर बोलणार होते. माझं भाषण मी आयोजकांना पाठवलं होतं. त्यांनी त्याचा अनुवाद केला होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार आहेत, याची मला कल्पना नव्हती. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित माझं भाषण आवडलं नसेल,' असं सहगल म्हणाल्या.

गोवंश, गोमांसावरुन होणाऱ्या हत्या, द्वेषाचं राजकारण, लेखकांचे-विचारवंतांचे खून याबद्दल प्रत्येक नागरिकाला लाज वाटायला हवी, असं मत सहगल यांनी व्यक्त केलं. 'हा देश फक्त हिंदुंचा आहे, असं काहींना वाटतं. मात्र हा देश हिंदुस्तानातील प्रत्येकाचा आहे. गेल्या काही काळात अनेक विचारवंत आणि लेखकांच्या हत्या झाल्या. गौरी लंकेश, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांनी जीव गमावला. प्रख्यात व्यक्तींचे खून झाले. तर आपल्याला माहीत नसलेले अनेकजण जमावाकडून मारले गेले. गोमांस सापडल्याच्या संशयावरुन, गायींच्या तस्करीच्या अफवेवरुन हिंसाचार सुरू आहे. जमावाकडून खून पाडले जात आहेत. या हल्लेखोरांना सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे. देशातील या परिस्थितीची भारतीय म्हणून लाज वाटायला हवी,' अशी भावना सहगल यांनी व्यक्त केलं.

Web Title: everyone should feel ashamed of current situation in country says nayantara sahgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.