"न्याय सगळ्यांना सारखाच हवा, बरोबर ना मुख्यमंत्री साहेब?", मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 11:48 AM2022-04-23T11:48:33+5:302022-04-23T11:49:25+5:30
Sandeep Deshpande tweet on Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree : राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसैनिक यांच्यात सुरू असलेला गोंधळ पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला असल्याने आज मुंबईत गोंधळ सुरू आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत, तर मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम आहे. यावरून मातोश्री बाहेर जोरदार राडा रंगला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसैनिक यांच्यात सुरू असलेला गोंधळ पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत हल्ला चढवला आहे. "तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवलीत काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नकोय. आम्ही काय चुकीचं बोलतोय? न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब???", असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याचबरोबर, "शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे. एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत," असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवलीत काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नकोय. आम्ही काय चुकीचं बोलतोय?न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 23, 2022
मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमले शिवसैनिक
राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल शिवसैनिकांची भेट घेतली. यानंतर रात्रभर शिवसैनिकांचा मातोश्रीवरील ओघ सुरूच होता. मध्यरात्रीपासूनच शिवसैनिकांची मातोश्रीबाहेर गर्दी जमा झाल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना पूर्णपणे ट्रॅप मध्ये फसत चालली आहे,एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 23, 2022
राणांच्या घराबाहेर मध्यरात्री शिवसैनिकांची घोषणाबाजी
मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दिवसभर रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर मध्यरात्री शिवसैनिकांनी राणांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. तसेच, शनिवारी सकाळपासूनच याठिकाणी शिवसैनिक जमा झाले आहेत.