सर्वांचा विश्वास नक्की सार्थ ठरवेन
By admin | Published: November 17, 2016 04:02 AM2016-11-17T04:02:34+5:302016-11-17T04:02:34+5:30
रंगभूमीवर ६१ वर्षे लीलया संचार करणाऱ्या सावरकरांची ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
पुणे : वयाच्या ८० व्या वर्षीही रंगभूमीवर असलेला सहजसाध्य वावर...हसवता हसवता रसिकांना अंतर्मुख करायला लावणाऱ्या विविधांगी भूमिका...रंगभूमीकडे सेवा म्हणून पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि नाटकाच्या वेडापायी आणि कुटुंबाच्या चरितार्थासाठी रंगभूमीवर कार्यरत असल्याचा स्पष्टवक्तेपणा...या गोष्टींचे मिश्रण असलेले रंगभूमीवरील एक प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर. रंगभूमीवर ६१ वर्षे लीलया संचार करणाऱ्या सावरकरांची ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद..
अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, त्याबद्दलची भावना काय?
हे पद सन्मानाने आणि बिनविरोधपणे मिळाले, तर नक्की स्वीकारेन, असे पूर्वीच मी म्हटले होते. त्या शब्दाचा मान राखण्यात आला व ही निवड एकमताने झाली याचा विशेष आनंद आहे. मी अजूनही कार्यरत असावे आणि माझ्या हातून अधिकाधिक चांगले काहीतरी घडावे, असे सर्वांना वाटत आहे. त्या सगळ्यांचाच विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन.
अध्यक्षपदामागची भूमिका
काय ?
नाट्यगृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्याबरोबरच कलाकारांना सामान्यांप्रमाणेच ज्या काही वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
रंगभूमीवर पहिला प्रवेश कसा झाला?
मी गिरगावात राहायचो. तेव्हा चाळीमध्ये असलेल्या गणेशोत्सवात नाटक करण्यासाठी माझी धडपड असे. दर वर्षी आम्ही नाटकांचे प्रयोग करत असू. नाटकातील हे पदार्पण. पण, पुढे नोकरीला लागलो आणि संबंध कमी येऊ लागला. पुरुषोत्तम बाळ हे माझ्या शेजारी राहायचे. १९५५ मध्ये बाळ मला विजया मेहतांकडे घेऊन गेले. त्यांच्या ग्रुपमध्ये मी सहभागी झालो. तिथून जो मला नाटकाचा नाद लागला तो आजही टिकून आहे. विजयाबाईंच्या ‘चार दिवस’ या एकांकिकेतून मी रंगभूमीवर प्रथम पाऊल ठेवले.
रंगभूमीवरील स्थित्यतरांविषयी तुमचे निरीक्षण काय?
पूर्वी रंगभूमीवर कौटुंबिक विषय अधिक हाताळले जात. आज रंगभूमीवर वास्तववादी
विषयांचे सादरीकरण केले जात
आहे. रंगभूमी दिवसेंदिवस प्रगत
होत आहे. जगामधल्या नवीन
गोष्टी, समाजाचे प्रतिबिंब
नाटकामध्ये उमटत आहे. सामाजिक विषयच आता अधिक जवळचे वाटू लागल्याने प्रेक्षकही आकर्षित होत आहेत.
सध्याच्या रंगभूमीवरील नवोदित कलाकारांबद्दल काय वाटते?
अभिनयातील कृत्रिमता जाऊन नैसर्गिक अभिनय करण्यावर भर दिला जात आहे. लेखक जे लिहितो तोच आशय अभिनयातून कसा मांडता येईल, याचा विचार नवोदित कलाकारांकडून केला जात आहे, ही खूपच जमेची बाब आहे.
अलीकडेच तुम्हाला भावलेले नाटक कोणते?
नाटक हा माझा आवडीचा प्रांत आहे. सामान्य प्रेक्षक म्हणून मला नाटके पाहायला आवडतात. पूर्वीसारखे फार नाटके पाहणे होत नाही. घरापासून थिएटर खूप लांब पडते. तरी ‘गोष्ट गंमतीची’ आणि प्रशांत दामलेचे ‘कार्टी काळजात घुसली’ ही नाटके पाहिली आणि ती आवडली.
आज नाटके पुण्या-मुंबईपुरती राहिली आहेत, असे वाटते का?
आमच्या काळात आम्ही राज्यभर दौरे केले. पण, आता
तसे होत नाही. हे दौरे का
होत नाहीत, त्याची कारणे
शोधून त्याविषयी नक्कीच
विचार करून, ठोस पावले
उचलणार आहे.
- नम्रता फडणीस