सर्वकाही शिवसैनिकांच्या भरवशावर

By admin | Published: February 13, 2017 12:45 AM2017-02-13T00:45:59+5:302017-02-13T00:45:59+5:30

जिल्हा परिषदांच्या राजकारणाकडे शिवसेनेने गांभीर्याने कधी न पाहिल्याने कायमच चौथे स्थान राहिले आहे. हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत आणि रत्नागिरी

Everything depends on the reliance of Shiv Sainiks | सर्वकाही शिवसैनिकांच्या भरवशावर

सर्वकाही शिवसैनिकांच्या भरवशावर

Next

जिल्हा परिषदांच्या राजकारणाकडे शिवसेनेने गांभीर्याने कधी न पाहिल्याने कायमच चौथे स्थान राहिले आहे. हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत आणि रत्नागिरी, औरंगाबाद या जिल्हा परिषदांमध्ये सर्वांत मोठा पक्ष असे मर्यादितच यश मागील निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी राहिली आहे. परिणामी, कॉँग्रेसच्या नेत्यांच्या, तसेच कार्यकर्त्यांच्या मुलांनी ग्रामीण भागात शिवसेनेचा विस्तार करण्यात आघाडी घेतली, असे मानले जात असले, तरी तिला मर्यादितच यश मिळाले आहे. हीच परंपरा चालू निवडणुकीतही कायम राहील, असे दिसते.
मुंबईसह कोकणपट्ट्याच्या खालोखाल शिवसेनेचा मराठवाड्यात दबदबा आहे. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जेमतेम ताकद असल्याने जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेहमीच स्वतंत्रपणे लढविताना शिवसेनेला मर्यादित यश मिळत राहिले आहे. गत निवडणुकीत पंचवीसपैकी हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत मिळाले होते. तेथे पन्नासपैकी सत्तावीस जागा सेनेने जिंकल्या होत्या, तसा तो चमत्कारच होता. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचा दबदबा आहे, पण पंचवीस जागा जिंकून तेथे सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून यश मिळविले असले, तरी बहुमतासाठी चार जागा कमी पडल्या, तेव्हा सात जागा जिंकणाऱ्या भाजपाची मदत घेण्यात आली होती. औरंगाबाद ही तिसरी जिल्हा परिषद होती की, जेथे साठपैकी सर्वाधिक सतरा जागा जिंकून शिवसेना सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला होता.
पंचवीसपैकी सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेला भोपळा फोडता आला नव्हता. सिंधुदुर्ग (४), नगर (६), कोल्हापूर (६), बीड (२), नांदेड (९), लातूर (५), अमरावती (७), वर्धा (१), चंद्रपूर (२), आणि गडचिरोली (२) असे दहा जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचे एक आकडी यश होते. नाशिकमध्ये १७, पुणे १२, जालना १५ आणि परभणीत ११ जागा जिंकून दुसरे स्थान पटकाविले होते. उर्वरित पाच जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना तिसऱ्या स्थानावर होती. त्यामध्ये रायगड १४, जळगाव १५, उस्मानाबाद १३, बुलडाणा ११ आणि यवतमाळ १२ यांचा समावेश होता. एक आकडी दहा आणि शून्यावर तीन ठिकाणी बाद होणे म्हणजे निम्म्या जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व नगण्यच आहे. लोकसभा निवडणूक भाजपाशी युती करून शिवसेनेने पुन्हा घवघवीत यश मिळविले, पण विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती तोडून शिवसेनेची फटफजिती केली. या दोन्ही पक्षांतील एक नंबरचे स्थानही शिवसेनेने गमाविले. या पार्श्वभूमीवर मुंबर्ई महापालिकेच्या राजकारणावरून दोन्ही पक्षांत घमासान चालू आहे. तरीदेखील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीकडे कोणाचे लक्ष नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या या संस्थांमधील वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी भाजपाने जवळपास सहा महिन्यांपासून केली आहे. त्या तुलनेने शिवसेनेने याकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. कोकणात रत्नागिरीसारख्या बाल्लेकिल्ल्यातसुद्धा नेत्यांची भांडणे सुरू आहेत. परिणामी, बंडखोरीचे लोण वाढले आहे. सत्तेची दावेदार असलेली शिवसेना मात्र मागे पडणार असे दिसते. राष्ट्रवादीची तख्ते आणि भाजपाची मर्यादित ताकद हीच रत्नागिरीत शिवसेनेची जमेची बाजू म्हणता येईल. मुंबई, ठाणे आणि नाशिकची लढत प्रतिष्ठेची करीत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापलीकडे एकही सभा ग्रामीण भागात दिलेली नसल्याने जिल्हा परिषदांचे राजकारण त्यांना दुय्यमच वाटते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत शिवसेनेचे चौथे स्थान कोणी हिरावून घेईल, असे वाटत नाही.
विदर्भापेक्षा मराठवाड्यात संधी
मराठवाड्यात तुलनेने भाजपापेक्षा शिवसेना अधिक चांगली लढत देऊ शकतो. कॉँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध भाजप या लढाईत शिवसेनेला संधी आहे, पण वरिष्ठ नेत्यांकडून शिवसैनिकांना बळच मिळत नाही. नाशिक, नगर, जळगावमध्येही हीच अवस्था आहे. विदर्भात मात्र, शिवसेनेची ताकद कमीच होण्याची शक्यता आहे.
-वसंत भोसले

Web Title: Everything depends on the reliance of Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.