देशात सर्वत्रच हिरवा आणि लाल दहशतवाद फोफावलाय - उद्धव ठाकरे

By Admin | Published: April 27, 2017 07:53 AM2017-04-27T07:53:00+5:302017-04-27T07:55:42+5:30

छत्तीसगढ आणि कश्मीरचा हिंसाचार देशाला अराजकाच्या खाईत ढकलताना दिसत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे

Everywhere in the country, green and red terrorism is unfolding - Uddhav Thackeray | देशात सर्वत्रच हिरवा आणि लाल दहशतवाद फोफावलाय - उद्धव ठाकरे

देशात सर्वत्रच हिरवा आणि लाल दहशतवाद फोफावलाय - उद्धव ठाकरे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
 मुंबई, दि. 27 - देशात सर्वत्रच हिरवा आणि लाल दहशतवाद फोफावला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दहशतवाद नष्ट होईल असे जे सांगितले गेले त्या आश्वासनी थोतांडांची सालपटं निघाली आहेत. हजार–पाचशेच्या नोटांमुळे काळा पैसा आणि दहशतवाद वाढला होता या भूलथापा कश्मीर आणि छत्तीसगढमध्ये उघड्या पडल्या आहेत. पुन्हा दोन हजारांच्या गुलाबी नोटांची नकली खाण रोज कुठेना कुठेतरी सापडत आहे. एकंदरीत सगळाच सावळागोंधळ सुरू असून छत्तीसगढ आणि कश्मीरचा हिंसाचार देशाला अराजकाच्या खाईत ढकलताना दिसत आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
अतिरेक्यांनी केलेला प्रत्येक हल्ला हा भ्याडच असतो, पण या भ्याड हल्ल्यात बळी जात आहेत ते आमच्या लष्करी जवानांचे, सामान्य नागरिकांचे आणि सीआरपीएफ जवानांचे. गेल्या महिनाभरात शंभरच्या आसपास सीआरपीएफ जवान मारले गेले. हे काही चांगल्या कायदा व सुव्यवस्थेचे लक्षण नाही. कश्मीरात व छत्तीसगढमध्ये रक्ताचे सडे पडत असताना आम्ही श्रद्धांजल्यांचे कार्यक्रम पार पाडून ‘राष्ट्रीय कर्तव्यास’ जागत आहोत. जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, असे फक्त सांगून काय होणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
कश्मीरातील युद्ध परक्या अतिरेक्यांनी पुकारले व त्यांना पाकड्यांची मदत मिळते आहे, पण छत्तीसगढमध्ये तर पाकडे वळवळत नाहीत. मग त्या देशी अतिरेक्यांचा बीमोड करताना तुमचे हात का थरथरत आहेत? एका क्षणात पंचवीस जवान मारले जातात व आमचे राज्यकर्ते त्या सांडलेल्या रक्ताचा सूड घेऊ शकत नाहीत हे कसले लक्षण म्हणायचे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
कायदा व सुव्यवस्थेवरून जर दिल्लीने कश्मीरात राष्ट्रपती राजवट लावली तर तोच न्याय छत्तीसगढला लावावा लागेल. कश्मीर आणि छत्तीसगढसारख्या राज्यांमध्ये जवानांच्या बलिदानावर राज्यकारभाराचा गाडा हाकला जात आहे, पण आणखी किती जवानांचे बळी घेऊन राजशकट चालविण्याची हौसमौज आपण करून घेणार आहात? मूठभर नक्षलवादी देशाच्या निमलष्करी दलांना ‘चॅलेंज’ करत आहेत. गनिमी काव्याने खिंडीत गाठून जवानांच्या रक्ताचे सडे पाडत आहेत. लपूनछपून होणाऱ्या अशा भ्याड हल्ल्यांत लढण्याची संधी न मिळताच जवान धारातीर्थी पडत आहेत. हे कुठवर सहन करायचे? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
छत्तीसगढ, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांतील 200 जिल्ह्यांत नक्षलवाद्यांचे अमानुष तत्त्वज्ञान जाऊन पोचले आहे. शोषितांचा, वंचितांचा संघर्ष असे गोंडस नाव देऊन नक्षलींच्या रक्तरंजित कारवायांचे उदात्तीकरण करणाऱ्या मंडळींचाच खरेतर समाचार घेण्याची वेळ आता आली आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 

Web Title: Everywhere in the country, green and red terrorism is unfolding - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.