जयदीप आपटेच्या शिल्पालयातून गोळा केले पुरावे, सिंधुदुर्ग न्यायालयात करणार सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 12:25 PM2024-09-07T12:25:00+5:302024-09-07T12:25:20+5:30
Jaideep Apte Arrest Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याच्या कल्याणमधील शिल्पालयास शुक्रवारी सिंधुदुर्ग पोलिसांनी भेट दिली.
कल्याण - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याच्या कल्याणमधील शिल्पालयास शुक्रवारी सिंधुदुर्ग पोलिसांनी भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी वापरलेले काही साहित्य ताब्यात घेतले. तत्पूर्वी आपटेची पत्नी, आई व शेजारी यांची तब्बल तीन तास चौकशी केली. आपटेचे कुटुंबीय आणि शेजारी यांनी तपास कामात सहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुतळा शिल्पालयात केला तयार
सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक दुपारी साडेतीन वाजता आपटेच्या घरी दाखल झाले. पथकाने साडेतीन ते सहा वाजेपर्यंत त्याची आई, पत्नी,रहिवाशांची चौकशी केली. नंतर पोलिस पथकाने आपटेच्या घराच्या मागच्या बाजूचे शिल्पालय गाठले. आपटे याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी जे साहित्य वापरले त्याचे काही नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले. सिंधुदुर्ग येथील न्यायालयात ते पोलिसांना सादर करायचे आहेत. आपटेने महाराजांचा पुतळा त्याच्या शिल्पालयात तयार केल्याचे चौकशीत सांगितल्याचे कळते.