सर्व पुरावे आहेत, तेही नावांनिशी; वरिष्ठांपुढे सादरही करू; खडसेंचा महाजनांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:10 PM2019-12-07T16:10:29+5:302019-12-07T16:11:20+5:30
गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा आहे.
जळगावः गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्रस्तरीय 5 जिल्ह्यांची बैठक शनिवारी दुपारी जळगावातील औद्योगिक वसाहत भागातील खासगी रिसॉर्टवर सुरू होती, खडसेंनी त्या बैठकीला अचानक उपस्थिती लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. या बैठकीला खासदार रक्षा खडसे व रोहिणी खडसेसुद्धा उपस्थित होत्या. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ खडसे प्रचंड नाराज असल्याचं जाणवले. आपणाकडे सर्व पुरावे आहेत आणि नावानिशी आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने ते सर्वांसमोर मांडणार असल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.
गिरीश महाजन यांनी पुरावे मगितल्याच्या वृत्तावर आलेल्या सोशल मीडियावरील कंमेंटच्या झेरॉक्स काढल्या असून, त्या प्रदेशाध्यक्षांकडे देणार आहे, असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलेलं आहे. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावे एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचे ते सांगत आहेत. त्यांनी ती नावे गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत, असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिले होते.
कुणीच कुणाला पाडत नसते. त्यांना अपयश आले, याचे आम्हालाही वाईट वाटते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे हे यापूर्वीही अॅड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात 1200 मतांच्या फरकाने आणि मागील निवडणुकीत प्रचंड मोदी लाट असतानाही केवळ 8500 मतांनी निवडून आले आहेत. यावेळी खडसे यांना तिकीट नाकारल्यानं फरक पडल्याचं त्यांनी सांगितलं होतं.