रजा घेऊ इच्छिणा-या पोलिसांना द्यावे लागणार पुरावे
By admin | Published: April 28, 2016 05:22 AM2016-04-28T05:22:28+5:302016-04-28T05:22:28+5:30
रजा घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईतील पोलिसांना आता त्याबाबतचे सबळ पुरावे वरिष्ठांना द्यावे लागणार आहेत. त्याशिवाय त्यांची रजा मंजूर केली जाणार नाही
मुंबई : विविध कारणांमुळे रजा घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईतील पोलिसांना आता त्याबाबतचे सबळ पुरावे वरिष्ठांना द्यावे लागणार आहेत. त्याशिवाय त्यांची रजा मंजूर केली जाणार नाही, असे आदेश बजाविण्यात आलेले आहेत.
गेल्या वर्षापासून पोलिसांना साप्ताहिक सुट्टीच्या बदल्यात एक दिवसाचा पूर्ण पगार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर, अपवादात्मक प्रसंगी त्यांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कामावर बोलाविले जाते. त्यामागे पोलिसांना आराम मिळण्याबरोबरच, त्यांना द्यावा लागणारा मोबदला वाचविण्याच्याही दृष्टिकोन आहे.
मात्र, त्याचबरोबर अधिकारी व अंमलदारांकडून अर्जित व धनार्जित रजा म्हणजेच मंजूर व पगारी रजा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी संबंधित परिमंडळ, घटकातील अप्पर आयुक्त व उपायुक्तांची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्यामुळे त्या विभागाकडे अर्ज पाठविला जातो. त्यामध्ये विवाह, घरबांधणी/खरेदी, व्याधींवर उपचार अशी कारणे दिली जातात.
त्या अनुषंगाने कसलाही पुरावा सादर केला जात नाही. त्यासंबंधी योग्य खातरजमा करून रजेला मंजुरी द्यावी, अशी सूचना आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार, दक्षिण प्रादेशिक विभागात
त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
असे लागतील पुरावे...
रजेला मंजुरी मिळविण्यासाठी जे कारण दिले आहे. त्यानुषंगाने त्यासंबंधी पुरावे सादर करावे लागतील. उदाहरणार्थ, जर लग्नाचे कारण देऊन एखाद्या अधिकारी/कर्मचाऱ्याने रजेची मागणी केल्यास, त्याला लग्नपत्रिका अर्जासोबत जोडावी लागेल. घरखरेदीबाबतचा व्यवहार करावयाचा असल्यास, त्यासंबंधी कागदोपत्री पुरावा सादर करावा लागणार आहे.
च्पुराव्याविना मंजुरीसाठी पाठविलेले रजेचे सर्व अर्ज संबंधित पोलीस ठाणे/शाखेत पाठविण्यात आले आहेत. त्याच्यासोबत पुरावा जोडून ते पुन्हा सादर करण्याच्या सूचना अप्पर आयुक्त प्रताप दिघावकर यांनी अधिकारी व अंमलदारांना केली आहे.