ईव्हीएममध्ये घोळ शक्यच नाही!
By admin | Published: March 7, 2017 04:25 AM2017-03-07T04:25:23+5:302017-03-07T04:25:23+5:30
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कोणताही घोळ करता येत नाही.
नागपूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कोणताही घोळ करता येत नाही. पराभूत झालेल्या उमेदवारांकडून याबाबतचा आरोप करण्यात येत असला तरी हा विषय भाजपाचा नाही. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत निष्पक्ष चौकशी करावी, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
नागपुरात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या दानवे यांनी सोमवारी लोकमत भवन येथे सदिच्छा भेट दिली आणि संपादकीय सहकाऱ्यांशी राज्यातील निवडणूक निकालावर चर्चा केली. यापूर्वी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी रावसाहेब दानवे व खासदार कपिल पाटील यांचे स्वागत केले.
भाजपाचे संघटन व राज्य सरकार यात कुठलेच मतभेद नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पार्टीचा चेहरा बनले आहे, असे सांगून दानवे म्हणाले, मुंबईत पक्षाला सर्वच समाजाची मते मिळाली आहेत. इतकेच नाही तर भाजपाने मुंबईत शिवसेनेच्या मराठी ‘व्होट बँके’ला सुरुंग लावला. परळीतील पराभवानंतर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दानवे म्हणाले की, पक्ष त्यांच्यासोबत आहे. या पराभवावर मंथन केले जाईल. तिथे कोण कुठे कमी पडले, यावर बैठकीत सविस्तर चर्चाही होईल. (प्रतिनिधी)
>शिवसेनेशी वैचारिक मतभेद नाही
मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी भाजपाने शिवसेनेला वॉकओव्हर देण्याचा घेतलेल्या निर्णयावर दानवे म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद नाही. काही बाबतीत त्यांची भूमिका वेगळी आहे. परंतु हिंदुत्वाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे एकच मत आहे.एकमेकांविरुद्ध निवडणुका लढल्यानंतर परत एकत्र येण्यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेनेने जेव्हा भाजपाला आपली ताकद वाढल्याचा हवाला दिला तेव्हा हिंगोली, बुलडाणा, रामटेक, ठाणे या लोकसभेच्या जागा भाजपाने सोडून दिल्या.
परंतु भाजपाची ताकद वाढली तेव्हा शिवसेना जागा सोडण्यास तयार नव्हती. अशा परिस्थितीमुळे दोन्ही पक्षांना एकमेकांना ताकद दाखविण्यासाठी विरोधात निवडणुका लढवाव्या लागल्या.
>विरोधकांनी कार्यकर्त्यांना दूर केले
काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी कार्यकर्त्यांना दूर लोटले. निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षामध्ये असंतोष दिसून आला. त्याचा फायदा भाजपाला मिळाला. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत.