ईव्हीएम : तक्रारीची चौकशी करा
By admin | Published: March 2, 2017 01:01 AM2017-03-02T01:01:23+5:302017-03-02T01:01:23+5:30
ईव्हीएम मशीनमध्ये (मतदान यंत्र) गोंधळ झाला असल्याची तक्रार पराभूत उमेदवारांकडून करण्यात आली आहे.
पुणे : महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये (मतदान यंत्र) गोंधळ झाला असल्याची तक्रार पराभूत उमेदवारांकडून करण्यात आली आहे. त्यांनी या ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढून त्याचा जोरदार निषेधही केला आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुकीतील उमेदवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करून त्यातील तथ्य लोकांसमोर यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
मी ज्या प्रभागातून उमेदवाराला मत दिले, त्याला त्या प्रभागातून शून्य मत दिसते. म्हणजे नक्कीच या मशीनमध्ये घोटाळा केल्याचे दिसत आहे. तसेच असे प्रकार एक किवा दोन ठिकाणी झाले असते तर ठिक होते; परंतु अशा प्रकारचे दृश्य शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. त्यातून असे जाणवते, की हा जाणूनबुजून केलेला घोटाळा आहे.
- अमित शेलार, व्यायाम प्रशिक्षक
पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच तेथील काही भाजपाच्या नेत्यांनी आम्ही बहुसंख्य जागा जिंकल्या नाहीत तर राजकारणातून संन्यास घेऊ, अशी घोषणा केली होती. लोकांच्या मनातील कळायला हे उमेदवार देव आहेत काय? त्यांनी ईव्हीएममध्ये घोळ केलेला असल्यानेच त्यांना तशी खात्री होती. या सर्व कारणांमुळे तर खरोखरच अता मशीनमध्ये घोटाळा केल्याचे वाटू लागले आहे.
- नामदेव मदने, कर्मचारी
पुण्यात ज्या ठिकाणी सीएमची सभा गर्दी नसल्याने रद्द झाली, त्या ठिकाणी ६२ जागा भाजपाला कशा मिळाल्या? दुसरे म्हणजे, नाशिक महापालिकेत मनसेची ५ वर्षे सत्ता होती, या ठिकाणी मोठी विकासकामे झाल्याचा दावा केला गेला, तरीही बोटांवर मोजण्याइतक्या सीट मनसेला कशा मिळाल्या? तिसरे म्हणजे नोटाबंदी, शेतमालाला भाव नाही, काळा पैसा आणण्याचे आश्वासन आणि अच्छे दिनचे गाजर या सगळ्यात पिचलेला मतदार भाजपाच्या मांडीवर जाऊन बसला तरी कसा? यासह आणखीही अनेक कारणे असताना राज्यात भाजपाला अतुलनीय यश मिळाले म्हणजे शंका येणे स्वभाविक आहे.
- नीलेश पायगुडे, उद्योजक
ईव्हीएम मशीन प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र असते. ते संगणकाप्रमाणे इंटरनेटला जोडता येत नाही. त्यामुळे त्यामध्ये कसल्याही प्रकारची छेडछाड करता येणे अशक्य असते. समजा मशीन बनविणाऱ्या किंवा देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कंपनीत छेडछाड झाली, असा संशय असल्यास ती गोष्ट त्यांच्या लक्षात येते. सर्व मशीनची रसमिसळ केली जाते. त्यामुळे कोणती मशीन कोणत्या ठिकाणी जाईल, हे कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे हा अरोप अयोग्य आहे, असे मला वाटते.
- योगेश शालगर, व्यापारी
मतदानासाठी मर्यादित खोल्या असतानादेखील जास्तीची मशीन कशी आली, असा सवाल उपस्थित होतो. आजपर्यंत राजकारणात असलेल्या कोणत्याही राजकारण्यांना कधीच निवडणुकीचे भाकीत सांगता आले नाही, तर संजय काकडे यांचे भाकीत तंतोतंत कसे जुळले, असा प्रश्न उभा राहतो.
- रमेश गोळे, कर्मचारी
हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी मते नावाजलेल्या उमेदवारांना मिळाल्याने शंका निर्माण होत आहे. तर, उमेदवारांना घरची तरी मते मिळायला हवी होती, तीही नाही मिळाली. पुण्यात असे प्रताप असंख्य ठिकाणी घडलेले उघडकीस आले आहे. अशा अनेक प्रश्नांमुळे शंकाकुशंका निर्माण होत आहेत. - मयूर भोसले, उद्योजक
हो आम्हाला असे वाटते, की ईव्हीएम मशीनमध्ये खरेच घोटाळा करता येऊ शकतो. परंतु, मला असे वाटते, ज्या उमेदवाराची पात्रता असेल, तोच निवडून यावा, अशी आमची इच्छा असते आणि त्यासाठी आम्ही मतदान करीत असतो. जर असेच घोटाळे होत राहिले, तर भविष्यात कोणताच नागरिक मतदान करणार नाही. - रामचंद्र मदने
ज्या मतदारसंघामध्ये बीजेपीने काम केले आहे, तिथे त्याचे उमेदवार निवडून येऊ शकतात. पण, ज्या ठिकाणी बीजेपीच्या उमेदवाराला कोणी ओळखतसुद्धा नाही, असे उमेदवार हजारो मतांनी निवडून आले. म्हणजे यामध्ये नक्कीच घोळ आहे. त्यामुळे मला असे वाटते, की बीजेपीचे सरकार काहीही करू शकते व मशीनमध्ये घोळ करणे त्यांच्यासाठी जास्त अवघड नाही.
-अॅड. स्नेहा खुंटे
आज ईव्हीएमचे जे घोटाळे चालू आहेत, माझ्या मते हे सत्य आहे. मला असे वाटते, की बीजेपी हे मशीन सेट करणारी आहे, कारण फॉर्म चेक करताना तुम्ही पाहिले असेल, की बीजेपीचे फॉर्म बाद झालेले दिसून आले नाही. जो उमेदवार अर्धा दिवस प्रचार करून जास्त मतांनी निवडून येतो म्हणजे मशीनमध्ये १०१ टक्के घोळ आहे, यात काही शंका नाही.
- कन्हैया पाटोळे
पुणे शहरात स्थानिक मतदाराला खूप कमी मते पडलेली दिसून आले. जर प्रचार न करता बीजेपीचा उमेदवार निवडुन येऊ शकतो, तर यावरूनच कळते, की मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केलेला आहे. सर्व पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे. आपल्या प्रभागाचे निवडणूक अधिकारी, निवडणूक आयुक्त, महापालिका आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार द्यावी.
- अशोक जाधव
पिंपरी-चिंचवड महापालिका गेल्या १० वर्षांपासून असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अक्षरश: भाजपाने उधळून टाकली. १२८ पैकी तब्बल ७८ जागा जिंकून भाजपाने महापालिकेवर निर्विवाद सत्ता काबीज केली. आज सामान्य माणूस नगरसेवक होऊ नये व त्याने उच्च पदावर जाऊ नये असे धोरण दिसून आले. आज जर पुणे महापालिकेची आकडेवारी पाहिली, तर सर्व नवीन चेहरे दिसत आहेत. असे उमेदवार की त्यांनी कोणतेही काम न करून फक्त बीजेपीच्या चिन्हावर निवडून आले. तर, यामध्ये घोटाळा आहे, हे नक्की.- तानाजी धानवले
मशीनमध्ये अशा प्रकारचे घोटाळे होत गेले, तर लोकांचा विश्वास उडू शकतो; त्यामुळे प्रत्येक मशीन मतदान प्रक्रियेसाठी केले जाते, तेव्हा त्याचे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम योग्य प्रकारे तपासूनच मशीन मतदान करण्याच्या दिवशी द्यायला हवी. जर असे केले नाही, तर आपली जी जुनी पद्धत होती, ती पुन्हा आणणे योग्य ठरू शकते.- गणेश धुकटे
अशा घटना जेव्हा घडतात, एखादा पक्ष सर्व बहुमताने निवडून येतो. असे प्रकार चर्चेमध्ये येत असतात. काही ठिकाणी असे वाटते, की एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता लक्षात घेता अपेक्षा प्रमाणे मत पडणे आणि जर मते कमी पडली असतील तर ईव्हीएम मशीनविषयी कुठे तरी संशय निर्माण होऊ शकतो. काही प्रमाणात तथ्य आहे, असे मला वाटते. कारण प्रशासन, निवडणूक मंडळ हे सर्व गोष्टींची अंमलबजावणी करीत असते. अजूनही भारतीय लोकशाहीवर व निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास आहे आणि तो उडू नये, असे मला वाटते.- कुलदीप आंबेकर
सध्याच्या या टेक्नॉलॉजी युगात मशीन हॅक करणे जास्त कठीण नाही आणि पैशाच्या जोरावर लोक काहीही करू शकतात कारण व्होटिंगच्या डमी मशीन सुद्धा काही लोकांकडे सापडल्या आहेत. त्यामुळे परत निवडणूक घेणे तर अशक्य आहे; पण इथून पुढे निवडणुकीमध्ये पहिली पद्धत वापरणे माझ्या मते योग्य ठरेल.- अविनाश शिंदे
>स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. काही उमेदवारांना तर शून्य मत मिळाले आहे. त्यांचे नातेवाईक अनेक असताना शून्य मत कसे काय? समजा नातेवाइकानेही त्यांना मत दिले नसेल, असे गृहीत धरले तर मीसुद्धा स्वत:ला मत दिले नाही काय? असा सवाल आता ज्यांना शून्य मत मिळाले असे उमेदवार करीत आहेत. हाच ईव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्याचा सर्वांत मोठा पुरावा आहे, असा आरोप उमेदवारांनी केली असता त्याची दखल न घेता त्यांनी निकाल जाहीर केला. ही एक प्रकारची हुकूमशाही आहे.
- अॅड. संतोष घुले