मनपा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनची जमवाजमव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 12:58 PM2017-02-05T12:58:27+5:302017-02-05T12:58:27+5:30
४५७० मशीन प्राप्त : उद्या होणार तांत्रिक तपासणी
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण उमेदवारांची संख्या येत्या ७ फेबु्रवारीला माघारीनंतर निश्चित होणार आहे. त्यापूर्वीच, मनपा प्रशासनाने मतदानासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनची जमवाजमव सुरू केली असून, आतापर्यंत ४५७० बॅलेट युनिट मनपाकडे प्राप्त झाले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी यंदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविली जात असून, ३१ प्रभागांसाठी १२२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. महापालिकेने निवडणुकीसाठी शहरात १४३३ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. प्रत्येक प्रभागात चार सदस्य निवडून द्यायचे असून, प्रत्येक गटासाठी वेगवेगळी मतपत्रिका असणार आहे. त्यासाठी वेगवेगळे बॅलेट युनिट उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. महापालिकेकडे आतापर्यंत १६२९ कंट्रोल युनिट तर ४५७० बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत. त्यासाठी १५९५ मेमरी कार्ड प्राप्त झाले आहेत. त्यात अजून २५ मेमरीची गरज भासणार आहे. त्याचीही मागणी नोंदविण्यात आली आहे. सदर ईव्हीएम मशीन अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून आणण्यात आली आहेत. येत्या ७ फेबु्रवारीला अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची संख्या स्पष्ट होईल. त्यानुसार, बॅलेट युनिटची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. गरज भासल्यास आणखी बॅलेट युनिटची मागणी आयोगाकडे नोंदविली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. सदर ईव्हीएम मशीनची फर्स्ट लेव्हल चेकिंग येत्या ६ व ७ फेबु्रवारीला मनपाच्या विद्युत विभागामार्फत केली जाणार आहे. त्यानंतर अद्ययावत ईव्हीएम यंत्रे प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला वितरित केली जाणार आहे.