EVM मशीन सॅटेलाइटद्वारे भाजपाकडून नियंत्रित केल्या जातात, चंद्रकांत खैरेंचा मोठा आरोप; अमित शहांच्या विधानाचा दिला दाखला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 04:59 PM2023-02-27T16:59:56+5:302023-02-27T17:00:35+5:30
भाजपाचे नेते आणि गृहमंत्री महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू म्हणतात, बिहारमध्ये ३६ जागा जिंकणार म्हणतात हे कोणत्या आधारावर दावा करत आहेत?
गडचिरोली-
भाजपाचे नेते आणि गृहमंत्री महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू म्हणतात, बिहारमध्ये ३६ जागा जिंकणार म्हणतात हे कोणत्या आधारावर दावा करत आहेत? त्यांच्या दाव्यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. देशातील निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. देशात आता निवडणूक मतदानासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरच हवा, अशीही मागणी खैरे यांनी यावेळी केली आहे.
ठाकरे गटानं राज्यभरात शिवगर्जना अभियानाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत ठाकरे गटाचे प्रमुख नेते राज्यातील विविध भागांमध्ये मेळावे घेऊन पक्षाला मजबूत करण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शिवगर्जना यात्रेतील दौरा गडचिरोतील आयोजित करण्यात आला होता. यावेळी खैरे यांनी भाजपावर सनसनाटी आरोप केला आहे.
"ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपर हवा अशी मागणी आम्ही आधीपासूनच करत आलो आहोत. अमित शाह मोठमोठ्या घोषणा करतात. महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू, बिहारमध्ये ३६ जागा जिंकू असं ते कोणत्या मुद्द्यावरुन सांगतात. आता जनता ते मान्य करणार नाही. हे सगळं सॅटेलाईटद्वारे नियंत्रित केलं जात आहे. त्यामुळे आम्हाला ईव्हीएम मशीन नको. आम्हाला बॅलेट पेपर हवा आहे", अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
मिंधे गटाला मजबूत केलं जातंय
"महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे. शिवसेना फोडण्याचं नीच काम मिंधे गटानं केलं आहे. फडणवीसांनी त्यांना स्ट्राँग केलंय. विकासाचं काम नाही. नोकऱ्या नाही. महागाई वाढली. एवढं असतानाही मिंधे गटाला स्ट्राँग केलं जाते. हेच सांगायला मी इथं आलो आहे", असं चंद्रकांत खैरे गडचिरोलीत म्हणाले.