ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:48 IST2024-11-22T16:45:00+5:302024-11-22T16:48:07+5:30
निवडणुकीचे काम संपल्यावर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात येत आहे. हा प्रकार मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी घडला आहे.

ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची?
निवडणूक काळात मतदानाच्या शेवटच्या काही दिवसांत महाराष्ट्रात पैशांचा महापूर आला होता. हे पैसे आता लखोट्यांमधून सापडू लागले असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक ड्युटीवर असलेल्या एका एसटी बसच्या मागील सीटखाली ५०० रुपयांची बंडले सापडल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
निवडणुकीचे काम संपल्यावर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात येत आहे. हा प्रकार मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी घडला आहे. यावेळी आपल्या मार्गावर असताना एका प्रवाशाला सीटखाली खाकी लखोटा दिसला, तो उघडून पाहतो तर त्यात ५०० रुपयांची दोन बंडले आढळली आहेत. ईव्हीएम आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या ने-आण करण्यासाठी वापरण्यात आलेली ही बस असल्याने ही बंडले या बसमध्ये कशी, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे प्रशासनातही खळबळ उडाली असून पोलीस याच्या तपासाला लागले आहेत. मतदान केंद्रावर ही बस उभी असताना कोणत्यातरी पक्षाच्या कार्यकर्त्याने पकडले जाऊ नये म्हणून ही बंडले फेकली असल्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रवाशाने ही बंडले वाहकाच्या ताब्यात दिली आहेत. या बसने कोपरगाव -वैजापूर-कोपरगाव असा प्रवास केला आहे. कोपरगावहून धामोरीला जात असताना एका विद्यार्थ्याला ही बंडले सापडली आहेत. मोजून पाहिले असता ही रक्कम 86 हजार एवढी भरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.