प्रत्येकी ५ बुथ, सर्व २८८ मतदारसंघांत ईव्हीएमची पडताळणी झाली; समोर उमेदवारही होते; आयोगाने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:19 AM2024-12-11T09:19:58+5:302024-12-11T09:20:13+5:30
विधानसभा मतमोजणीच्या वेळेस सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकूण १,४४० व्हीव्हीपॅटमधल्या स्लिपची अनिवार्य मोजणी २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या ५ मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅटमधील उमेदवारनिहाय स्लिपची संख्या यात कुठेही तफावत आढळलेली नाही, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट केले.
विधानसभा मतमोजणीच्या वेळेस सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकूण १,४४० व्हीव्हीपॅटमधल्या स्लिपची अनिवार्य मोजणी २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आली. मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्येकी पाच मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या समोर व उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रे निवडण्यात आली. प्रत्येक मतदारसंघांमधील ५ केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएमच्या मतांची उमेदवारनिहाय संख्या व व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली.
काय आहे नियम?
मतमोजणीच्या संदर्भातील भारत निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघाच्या पाच मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लिपची गणना अनिवार्य असून, ती पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाहीत.