भाजपाच्याच माजी खासदाराने वांग्यांवर फिरवला नांगर; भाव नसल्यानं राग अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 12:14 PM2018-06-05T12:14:28+5:302018-06-05T12:14:28+5:30
बाजारात वांग्याला फक्त तीन ते पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने लागवड आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाही....
नांदेड - शेतीमाल व दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला माल रस्त्यावर टाकून सरकारच्या धोरणाचा तीव्र विरोध केला आहे. यात भर पडली आहे भाजपाच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांची. हिंगोलीचे येथील भाजपाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी आपल्या पाच एकर वांग्याच्या पिकावर ट्रॅक्टर घालून पस्त केले आहे. वांग्याला बाजारात केवळ तीन ते चार रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे सुभाष वानखेडे यांनी सोमवारी वांग्याच्या पिकात ट्रॅक्टर घालून वांग्याची रोपे उपटून टाकली.
माजी खासदार तथा भाजपा नेते सुभाष वानखेडे यांनी वांग्याचे शेत उध्वस्त करुन सरकारला घरचा आहेर दिला. नांदेड जवळील हदगाव येथील आपल्या शेतात सुभाष वानखेडे यांनी पाच एकर मध्ये वांग्यांचे पिक घेतले होते. बाजारात वांग्याला फक्त तीन ते पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने लागवड आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाहीये. त्यामुळे संतप्त झालेल्या वानखेडे यांनी ट्रकटरद्वारे वांग्याचे पाच एकर शेत नांगरुन टाकले.
दरम्यान, सुभाष वानखेडे यांची पुन्हा आपला मूळ पक्ष शिवसेनेकडे वाटचाल सुरु असल्याची जोरदार चर्चा हिंगोली जिल्ह्यात आहे.
शेतीमाल व दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी राज्यात शेतकरी संप सुरु आहे. ५ जूननंतर हा संप आणखी तीव्र केला जाणार आहे. ६ व ७ जूनला शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना भाजीपाला पाठविणार नाही. त्यामुळे राज्यात बाजार समित्या बंदच ठेवल्या जाणार असल्याची माहिती किसान क्रांती जनआंदोलनाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी रविवारी दिली. त्यामुळे या संपाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.