माजी सभापतीची पत्नीला जबर मारहाण
By admin | Published: April 4, 2017 01:26 AM2017-04-04T01:26:52+5:302017-04-04T01:26:52+5:30
‘भाजी गार का वाढली?’ या कारणावरून पत्नीला पाय धुऊन पाणी पिण्यास भाग पाडून जबर मारहाण करण्यात आली.
नारायणगाव : ‘भाजी गार का वाढली?’ या कारणावरून पत्नीला पाय धुऊन पाणी पिण्यास भाग पाडून जबर मारहाण करण्यात आली. जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती देवेंद्र भिकाजी खंडे यांच्यावर पत्नीला जबर मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.
देवेंद्र भिकाजी खंडे
(रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूपाली खंडे (वय ३४, रा. सम्राट अशोक नगर, नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडे हे काल (दि. २) दुपारी १२.३० वाजता दारू पिऊन घरी आले. त्यांना त्यांची पत्नी रूपाली यांनी जेवण वाढले असता ‘तू भाजी गार का वाढली’ असे म्हणत पत्नीला शिवीगाळ केली. पत्नीने भाजी गरम करून देते म्हणाल्याने खंडे यांनी चिडून जाऊन पत्नीला मारहाण केली व स्वत:चे पाय धुऊन पत्नीला ते पाणी पिण्यास लावले. चार ग्लास पाणी जबरदस्तीने पिण्यास भाग पाडून पत्नीला पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तोंडावर जोराने बुक्क्या मारून जबड्यावरचे दोन दात पाडून अमानुषपणे मारहाण केली. खंडेवर अनेक बँकांचे कर्ज आहे. तसेच अनेकांकडून उसने पैसे घेतले आहेत. ते पैसे देणे शक्य नसल्याने त्यांना दारूचे व्यसन जडले होते.
कर्जामुळे बाहेरचा तणाव घेऊन खंडे हे अनेक वर्षांपासून पत्नी व मुलांना मारहाण करीत असे. खंडे यांना दारूचे व्यसन जडल्यामुळे ते पत्नी आणि मुलांना वारंवार मारहाण करीत असत. त्यांच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वी रुपाली खंडे या मुंबई येथे माहेरी गेल्या होत्या. परंतु, वडील व आई यांनी समजून सांगून त्यांना परत नारायणगाव येथे पाठवले होते. त्यानंतरही खंडे हा छोट्या-छोट्या कारणावरून शारीरिक व मारहाण त्रास देत आला होता. काल दारू पिऊन जबर मारहाण केल्याने खंडेच्या तावडीतून सुटून नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के. डी. ढमाले हे करीत आहेत. (वार्ताहर)