माजी संचालकांकडून १४७ कोटींची वसुली
By admin | Published: October 27, 2015 01:53 AM2015-10-27T01:53:48+5:302015-10-27T01:53:48+5:30
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालकांकडून १४७ कोटी रुपये वसूल करावेत, असे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालकांकडून १४७ कोटी रुपये वसूल करावेत, असे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले. चौकशी अधिकारी सचिन रावळ यांनी ‘कलम ८८’ नुसार केलेली वसुलीची कारवाई कायम ठेवली आहे.
सहकार विभागाने १३ नोव्हेंबर २००९ला बँकेवर प्रशासक नेमले. प्रशासकीय कामकाज सुरू असताना, बँकेच्या कारभाराची चौकशीही लावण्यात आली. त्यामध्ये विनातारण कोट्यवधी रुपयांचे कर्जवाटप, नियमबाह्य, अपुरे तारण कर्जवाटप व २००६-०७ या आर्थिक वर्षात बँक तोट्यात असताना, वाटप केलेला लाभांश आदींमुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यानुसार चौकशी अधिकारी सचिन रावळ यांनी २३ जानेवारी २०१५ रोजी माजी संचालकांकडून १४७ कोटी वसुलीचा अहवाल विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांच्याकडे सादर केला होता.
दराडे यांनी माजी संचालकांना वसुलीच्या नोटिसा लागू केल्या होत्या. या नोटिसांविरोधात माजी संचालकांंनी न्यायालयात धाव घेतली होती, तर काहींनी सहकार विभागाकडे दाद मागितली होती. माजी संचालकांना निवडणूक लढविण्यास परवानगी देऊन सुनावणी सहकारमंत्र्यांसमोर करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार गेले महिनाभर सहकारमंत्री पाटील यांच्यासमोर माजी संचालकांची सुनावणी पूर्ण झाली होती. या सुनावणीवर सोमवारी मंत्री पाटील यांनी निकाल दिला. माजी संचालकांनी स्वत:च्या मालमत्तेचे वर्णन सहकार खात्याकडे यापूर्वीच सादर केले असल्याने, वसुलीचा मार्ग सुकर होणार आहे. (प्रतिनिधी)