म्हाडाचा माजी उपायुक्त नितीश ठाकूरला यूएईमध्ये अटक, पैशांची अफरातफर केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 10:25 AM2018-02-07T10:25:09+5:302018-02-07T10:25:26+5:30
सरकारी सेवेत असताना कोट्यवधी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप असलेला म्हाडाचा माजी उपायुक्त नितीश ठाकूर याला अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली- सरकारी सेवेत असताना कोट्यवधी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप असलेला म्हाडाचा माजी उपायुक्त नितीश ठाकूर याला अटक करण्यात आली आहे. नितीश ठाकूरला यूएई अटक झाल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
२१ जानेवारी रोजी नितीश ठाकूरला अटक करण्यात आली असून त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू करण्यात आल्याचं शिव प्रताप शुक्ला यांनी सांगितलं. ईडीच्या विनंतीनंतर इंटरपोलने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. 2011 आणि 2012 मध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
या आधी 2016 मध्ये महाराष्ट्र एसीबीने नितीश ठाकूरला अटक केली होती. त्यामुळे त्याने जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा जामीन मंजूर करताना ठाकूर याने ठाणे, मुंबई व रायगड जिल्हा सोडण्यापूर्वी न्यायालयाला कळवावं तसंच तपासकामी तपासयंत्रणेला सहकार्य करावं, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. गेल्या वर्षी नितीशचा भाऊ निलेश ठाकूरला ईडीने चौकशीसाठी अटक केली होती.