माजी मंत्री बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी; रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराची धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 08:40 AM2023-01-11T08:40:55+5:302023-01-11T09:29:22+5:30

अमरावतीत बच्चू कडू यांना हा अपघात झाला आहे. कडू मंगळवारी मुंबईहून अमरावतीला पोहचले होते.

Ex-minister Bachhu Kadu injured in accident; Collision with a bike while crossing the road | माजी मंत्री बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी; रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराची धडक

माजी मंत्री बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी; रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराची धडक

googlenewsNext

मुंबई - राज्यात अपघातांची मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, धनंजय मुंडे आणि योगेश कदम यांच्यानंतर आता प्रहारचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली. या अपघातात बच्चू कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली. 

शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात बुधवारी सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले. या अपघातात कडू यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यात ४ टाके पडले तर पायालाही मार लागला आहे. अमरावतीच्या खासगी रुग्णालयात कडू यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

काही दिवसांपूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेले गोरे यांच्यावर अद्याप पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांचाही अपघात झाला. त्यात मुंडे यांच्या छातीला मार लागल्याने तेदेखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. तर रायगडच्या कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. या धडकेत कदम यांच्या वाहनाचा मागील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने योगेश कदम यांना अपघातात दुखापत झाली नाही. 

राज्यातील रस्ते अपघातात रोज अनेकांचे जीव जातात. मागील वर्षी आमदार विनायक मेटे यांचाही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात झाला. या अपघातात दुर्दैवाने मेटे यांना जीव गमवावा लागला होता. मेटेंच्या मृत्यूनंतर रस्ते अपघाताबाबत विधानसभेतही या मुद्द्यावर चर्चा झाली होती. रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं तातडीनं पाऊल उचलणं गरजेचे आहे. त्याचसोबत वाहन चालकांनीही सतर्कता बाळगायला हवी. वाहनांच्या वाढत्या वेगावर नियंत्रण ठेवायला हवं. वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहने चालवली तर रस्ते अपघाताताचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. 
 

Web Title: Ex-minister Bachhu Kadu injured in accident; Collision with a bike while crossing the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.