माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना तीन महिन्यांची शिक्षा, अकोट न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 01:45 AM2019-12-04T01:45:58+5:302019-12-04T01:50:01+5:30
अकोट-अकोला रस्त्यावरील बळेगाव फाट्यावर रस्त्याचे काम सुरू असताना ३१ मे २०१३ रोजी गावंडे हे कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले होते.
अकोट : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव रामराव गावंडे यांना अकोटच्या न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवत तीन महिन्यांचा कारावास तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यास इजा पोहोचविल्याप्रकरणी एक महिन्याचा कारावास व ५०० रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील दुसरे आरोपी तत्कालीन आमदार गजानन दाळू यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
अकोट-अकोला रस्त्यावरील बळेगाव फाट्यावर रस्त्याचे काम सुरू असताना ३१ मे २०१३ रोजी गावंडे हे कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले होते. त्यांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून थांबविले होते. घटनास्थळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोज पृथ्वीराजसिंह बैस यांना बोलावले होते. तेथे पोहोचल्यानंतर गावंडे यांनी आपल्याबरोबर वाद घातला. तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करीत पेटवून देण्याची धमकी दिली. याचवेळी त्यांच्या एका कार्यकर्त्याने आपल्या अंगावर कॅनमधील रासायनिक द्रव्य फेकले, अशी फिर्याद बैस यांनी दिली होती. पाकळ हे मला वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही बैस यांनी फिर्यादीत म्हटले होते. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला.
आंदोलन जनहितासाठी
बळेगाव फाट्यावर सुरू असलेल्या रस्ता कामामुळे जनता त्रस्त झाली होती. त्या मार्गावरून जाताना ३१ मे २०१३ रोजी तिथे गर्दी जमलेली दिसली. त्यावेळी थांबलो तर लोकांनी सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून थांबविले होते, हे लक्षात आले. यावेळी घटनास्थळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा चांगलाच वाद झाला. मी न्यायालयाचा आदरच करतो, निकालाचा पूर्ण सन्मान ठेवून मी सांगू इच्छितो की, ते जनआंदोलन होते. सामान्यांसाठी मी मागे हटणारा नाही; पण जनआंदोलनाबाबत असा निर्णय येत असेल, तर वरच्या न्यायालयात अपील केले जाईल.