द्रुतगती मार्गावर माजी सैनिकांची सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 01:07 AM2016-08-30T01:07:45+5:302016-08-30T01:07:45+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीला शिस्त लावणे आणि वाढते अपघात रोखण्यासाठी आता पोलिसांबरोबर माजी सैनिकांचाही पहारा राहणार आहे.
राजानंद मोरे, पुणे
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीला शिस्त लावणे आणि वाढते अपघात रोखण्यासाठी आता पोलिसांबरोबर माजी सैनिकांचाही पहारा राहणार आहे. कळंबोली ते वडगाव मावळ या ९४ किलोमीटरच्या हद्दीत सुमारे १२० माजी सैनिक वाहतूक नियंत्रक म्हणून गस्त घालणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ही योजना आखण्यात आली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महामंडळाकडून पहिल्यांदाच माजी सैनिकांची मदत घेतली जाणार आहे.
मागील काही महिन्यांत द्रुतगती महामार्गावर जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने लेन कटिंग, अतिवेग, रस्त्याच्या कडेला बेकायदा थांबा या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर विशेष रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्यात आली. या काळात रस्ते विकास महामंडळ व महामार्ग पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. ही मोहीम प्रभावीपणे कायमस्वरूपी राबविण्यासाठी सध्या महामार्ग पोलिसांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. हे विचारात घेऊन रस्ते विकास महामंडळाने पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘मेस्को’ला पाठविलेल्या पत्रात ‘वाहतूक नियमन करण्यासाठी १२० वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करण्याचे नियोजन आहे. महामार्गावरील कळंबोली, पळसपे, बोरघाट, खंडाळा, वडगाव मावळ या पोलीस मदत चौकीअंतर्गत त्यांना नेमण्यात येणार आहे’, असे नमूद केले आहे. कळंबोलीपासून वडगाव या ९४ किलोमीटरच्या हद्दीत या माजी सैनिकांची ठरावीक अंतरावर नेमणूक करण्याचे प्रस्तावित आहे.