नेमकं कोणत्या मुस्लिमांना इथं राहा म्हणतायेत?; पडळकरांचा अब्दुल रहमांनावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 11:03 AM2023-10-07T11:03:36+5:302023-10-07T11:03:49+5:30
जे भारतीय मुस्लीम आहेत ते देशाचे नागरीक आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे प्रशासनाकडून मिळतात असं पडळकरांनी म्हटलं.
मुंबई – केवळ मुसलमानच टार्गेट नाही तर पहिले टार्गेट मुस्लिम, दुसरे टार्गेट दलित, तिसरे आदिवासी, चौथे ओबीसी, पाचवा गरीब आणि अखेर मनुस्मृती देशात लागू करणे सर्वांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाईल असा आरोप करत अब्दूर रहमान यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. त्याचसोबत मुस्लीम लोकांना मतदार यादीत नाव नोंदवण्याचे आवाहन केले. त्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी सवाल उपस्थित केला आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जे भारतीय मुस्लीम आहेत ते देशाचे नागरीक आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे प्रशासनाकडून मिळतात. मग हे अब्दूर रहमान नेमकं कोणत्या मुसलमानांना आधार कार्ड, वोटिंग आयडी बनवून घेऊन इथं राहा असं म्हणत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अब्दुर रहमान यांनी मुस्लिम समुदायाला आवाहन करताना तुम्ही सर्वात आधी तुमचे मतदान कार्ड व्यवस्थित बनवा. आजच जाऊन आधार कार्ड, मतदान कार्ड आणि अन्य कागदपत्रे व्यवस्थित बनवा. जर एखादा दलित, मुस्लीम घर बदलतो तेव्हा त्याचे नाव यादीतून काढले जाते. तुम्ही जिथे जाता तिथे सर्वात आधी मतदान कार्डात नाव टाका, मतदार यादीत पुरुषाला महिला दाखवले जाते, फोटो बदलले जातात असा आरोप त्यांनी केला.
जे भारतीय मुसलमान आहेत ते देशाचे नागरीक आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे प्रशासनाकडून मिळतात मग हे अब्दूर रेहमान नेमकं कोणत्या मुसलमानांना ‘आधार कार्ड व वोटींग आयडी’ बनवून घेऊन येथे रहा असं म्हणत आहेत? @BJP4India@BJP4Maharashtrapic.twitter.com/IwaUvJPKO6
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 5, 2023
त्याचसोबत भाजपाचे लोकं येतात, तुमच्या मतदार कार्डाला आव्हान देतात. त्यानंतर निवडणूक आयोग कुठल्याही चौकशीविना तुमचे मतदार कार्ड रद्द करतो. तुम्ही सजग व्हा, सर्वात आधी तुमचे मतदान कार्ड बनवा. कार्ड बनवल्यानंतर जी मतदार यादी आहे ती पाहा, त्यात तुमचे नाव, स्पेलिंग योग्य आहे का ते पाहा असं अब्दूर रहमान यांनी मुस्लीमांना आवाहन केले होते.
कोण आहेत अब्दूर रहमान?
बिहारच्या पश्चिम चंपारण येथील अब्दुर रहमान हे आयपीएस अधिकारी राहिले आहेत. १९९७ मध्ये महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये एसपी, एएसपी, डीआयजी, आयजी या पदांवर काम केले. २०१९ मध्ये जेव्हा CAA कायदा आणण्याची तयारी झाली तेव्हा असंवैधानिक आणि कलम १४ चे उल्लंघन करणारे असल्याचा विरोध करत निषेधार्थ रहमान यांनी पदाचा राजीनामा दिला. अब्दुर रहमान यांनी आधीच काही पुस्तके प्रकाशित केली आहेत परंतु त्यांचे नवीन पुस्तक एब्सेंट इन पॉलिटिक्स एँड पॉवर, पॉलिटिकल एक्सक्लूजन ऑफ इंडियन मुस्लिम हे प्रकाशित झाले आहे.