‘कट आॅफ’ फुगलेल्या महाविद्यालयांची तपासणी
By admin | Published: July 2, 2016 02:02 AM2016-07-02T02:02:46+5:302016-07-02T02:02:46+5:30
खासगी कोचिंग क्लासेसशी असलेल्या छुप्या करारामुळे शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांचे अकरावीचे कटआॅफ वाढले आहे.
पुणे : खासगी कोचिंग क्लासेसशी असलेल्या छुप्या करारामुळे शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांचे अकरावीचे कटआॅफ वाढले आहे. त्यामुळे सोयीसुविधा, गुणवत्ता नसलेल्या या महाविद्यालयांचे हे फुगलेले कट आॅफ पाहून विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे त्यांची फसगत होत आहे. हे रोखण्यासाठी अशा ‘कट आॅफ’ फुगलेल्या महाविद्यालयांची स्वतंत्र पथकांमार्फत तपासणी केली जाईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक एन. के. जरग यांनी दिली.
अकरावी प्रवेशाची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील पहिल्या फेरीचे विविध महाविद्यालयांचे कट आॅफ नुकतेच जाहीर करण्यात आले. मागील काही वर्षांपासून आवश्यक सोयीसुविधा नसलेल्या काही कनिष्ठ महाविद्यालयांचे ‘कट आॅफ’ वाढताना दिसत आहे. या वर्षीही ही स्थिती कायम राहिली आहे. खासगी कोचिंग क्लासेसशी छुपा करार आणि प्रात्यक्षिक व ७५ टक्के हजेरीतून सवलत देणाऱ्या महाविद्यालयांबाबतही हे घडत आहे. याबाबत ‘लोकमत’ सातत्याने पाठपुरावा केला आहे. क्लासेसशी करारानुसार काही महाविद्यालयांपासून मिळणाऱ्या सवलतीमुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी सोयी-सुविधा, गुणवत्ता नसलेल्या महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेतात. त्यामुळे या महाविद्यालयांचे कट आॅफ वाढते. पुढील वर्षी हेच कट आॅफ पाहून विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची या फुगीर कट आॅफमुळे फसगत होत आहे.
याबाबत शिक्षण विभागाकडून कडक पावले उचलली जाणार आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देवून हजेरीपटाची तपासणी केली जाणार आहे. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना जरग म्हणाले, अचानक कटआॅफ वाढलेल्या महाविद्यालयांचे अभिनंदन करायला हवे. पण हे कट आॅफ अचानक कसे वाढले, याची तपासणी केली जाईल. त्यासाठी स्वतंत्र पथके नेमून संबंधित महाविद्यालयात पाठविली जातील. (प्रतिनिधी)