अकराशे ग्रामपंचायतींतील शौचालयांची तपासणी
By admin | Published: April 18, 2017 02:50 AM2017-04-18T02:50:36+5:302017-04-18T02:50:36+5:30
पुणे जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने युद्धपातळीवर प्रयत्न करून ३१ मार्च २०१७ च्या आत हगणदरीमुक्त केला.
पुणे : पुणे जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने युद्धपातळीवर प्रयत्न करून ३१ मार्च २०१७ च्या आत हगणदरीमुक्त केला. त्यातील जिल्ह्यातील १ हजार ११७ ग्रामपंचायतींमध्ये बांधण्यात आलेल्या शौचालयांची तपासणी करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य शासनाने ४४ संस्थांची मदत घेतली आहे. या संस्था लवकरच तपासणीनुसार अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविणार आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील एकही कुटुंब उघड्यावर शौचालयास जात नाही ना? ग्रामपंचायत परिसरात मानवी व छोट्या मुलांची विष्ठा दिसून येत नाही ना?, वापरण्यात येणारी वैयक्तिक, सार्वजनिक शौचालये फ्लायप्रूफ आणि वापरण्यायोग्य तसेच तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का?, ग्रामपंचायतीतील सर्व शाळा, परिसर स्वच्छ आहे का?, अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहांची उपलब्धता, हगणदरीमुक्तदर्जा टिकविण्यासाठी ग्रामपंचायतीने देखरेख व पाठपुरावा व्यवस्था निर्माण केलेली आहे? सरकारी कार्यालय, समाजमंदिर येथील स्वच्छतागृहे अशा
बाबींची तपासणी संस्थांमार्फत करत आहे.
२४३ ग्रामपंचायतींत बांधलेल्या शौचालयांची सात संस्थांमार्फत तपासणी केल्यानंतर या संस्थांनी आपला अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. यात संस्थांच्या तपासणीत १८ गावे अपात्र ठरली होती. आता आजून ८७४ ग्रामपंचायतींची ४४ स्वयंसेवी संस्थामार्फत तपासणी पूर्ण केली.
(प्रतिनिधी)
जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर
आतापर्यंत भोर तालुक्यातील १५५, खेडमधील १४८, जुन्नरमधील १०६, हवेलीतील ९९, मुळशी ९५, पुरंदर ९०, शिरूरमधील ७८, दौंड ७५, वेल्ह्य ७०, बारामती ६२, मावळमधील ५८, आंबेगाव ५०, तर इंदापूर येथील ३१ ग्रामपंचायतींमधील शौचालयांची तपासणी केली आहे. एका वर्षात एक लाखाहून अधिक शौचालये बांधणारा पुणे जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शौचालयांचा वापर व्हावा, तसेच शाश्वत विकास टिकून राहण्यासा प्रयत्न सुरू आहे.