रिक्षाचालकांची परवान्यासाठी ‘मराठी’त परीक्षा
By admin | Published: March 1, 2016 12:56 AM2016-03-01T00:56:47+5:302016-03-01T00:56:47+5:30
लॉटरी पद्धतीने रिक्षाचा परवाना मिळालेल्या उमेदवारांच्या परवान्यासाठी मराठी भाषा ज्ञानचाचणी सुरू झाली. परिवहन विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून
चिखली : लॉटरी पद्धतीने रिक्षाचा परवाना मिळालेल्या उमेदवारांच्या परवान्यासाठी मराठी भाषा ज्ञानचाचणी सुरू झाली. परिवहन विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून (दि. २९) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) ही चाचणी घेण्यात आली. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ठरवून दिलेल्या दिवशी परवानाधारकांची चाचणी, कागदपत्रांची तपासणी, तसेच शुल्क भरून घेतले, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
राज्य शासनाकडून रिक्षापरवाना वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड विभागात ५४६ परवाने वाटप केले जाणार आहेत. ज्यांना लॉटरीचा परवाना मंजूर झाला आहे, त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे.
मोटर वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार, अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान आहे की नाही, हे तपासण्यासाठी ही चाचणी घेतली गेली. पिंपरी-चिंचवड विभागात २९ फेब्रुवारीला १०० अर्जदारांची चाचणी घेण्यात आली. त्यांपैकी ९९ अर्जदार उपस्थित होते.
उमेदवाराला मराठी पाठ्यपुस्तकातील एक परिच्छेद वाचण्यासाठी देण्यात आला. ज्या उमेदवारांना वाचन येत नसेल, अशांना शहर परिसरातील भौगोलिक माहितीचे १० प्रश्न विचारण्यात आले. याचे चित्रीकरण करण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक व अनुभवी वार्ताहरांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. या वेळी उमेदवारांकडून कागदपत्रे व परवाना शुल्काचा डीडी घेण्यात आला. उत्तीर्ण उमेदवारांना पुढील आठवड्यात परवान्याचे वाटप केले जाणार आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास परवाना वाटप केले जाणार नाही.
रिक्षाचालकांचे ज्ञान तपासण्यासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे चालकांनाही परीक्षेची तयारी करावी लागत आहे.
(वार्ताहर)मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबत चाचणी घेण्याचे काम सुरू असून, यासाठी जबाबदार प्रादेशिक परिवहन अधिकारी व अनुभवी वार्ताहर यांच्या समक्ष परवाना लॉटरी विजेत्या उमेदवारास पाठ्यपुस्तकातील उतारा वाचण्यास सांगितले जाते. २००६ च्या अगोदर बॅच काढला असेल व उमेदवार निरक्षर असेल, तर त्यास परिसरातील भौगोलिक माहितीचे १० प्रश्न विचारले जातील. अर्जदाराला ज्या दिवशी बोलावले आहे, त्याच दिवशी येणे बंधनकारक आहे. कोणत्याही कारणास्तव त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही.
- अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
स्थानिक लोकांसाठी हा चांगला निर्णय आहे. परप्रांतीयांना परवाना वाटप होण्याचे प्रमाण कमी होईल. पारदर्शक कारभार असल्याने चाचणी देण्यास कसलीही अडचण आली नाही.
- नीलेश बोरगे, लॉटरी विजेता उमेदवार