प्राथमिक विद्यार्थ्यांच्या चाचणीचे पेपर फुटले

By admin | Published: April 6, 2017 12:34 AM2017-04-06T00:34:35+5:302017-04-06T00:34:35+5:30

राज्यभरामध्ये १ ली ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी परीक्षा आज (गुरुवार) व उद्या (शुक्रवार) होत आहे.

Examination papers of primary students broke | प्राथमिक विद्यार्थ्यांच्या चाचणीचे पेपर फुटले

प्राथमिक विद्यार्थ्यांच्या चाचणीचे पेपर फुटले

Next

पुणे : राज्यभरामध्ये १ ली ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी परीक्षा आज (गुरुवार) व उद्या (शुक्रवार) होत आहे. या मूल्यमापन चाचणीचे पेपर फुटल्याचा
प्रकार बुधवारी उजेडात आला आहे. मात्र केवळ भाषिक आणि गणिती कौशल्ये तपासण्यासाठी होत असलेल्या या परीक्षेचेही पेपर शाळांमधून फुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यातही फसवेगिरी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना शिकविलेले कितपत समजते आहे, याची तपासणी करण्याचे कोणताच मार्ग शिक्षण विभागाकडे नव्हता. यापार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या वर्षभरातून ३ मूल्यमापन चाचण्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी किमान भाषिक व गणिती कौशल्ये आत्मसात केली आहेत का, याची पाहणी या चाचण्यांमधून केली जाते. मात्र अत्यंत मूलभूत स्वरूपाचे सहज, सोपे प्रश्न असलेल्या चाचण्यांचेही पेपर परीक्षेपूर्वी फोडण्याचे प्रकार पुणे, मुंबई येथे घडल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या आहेत.
मूल्यमापन चाचण्यांमध्ये केवळ भाषा व गणित या दोन विषयांच्या केवळ ५० मार्कांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. गुरुवारी भाषा विषयाची तर शुक्रवारी गणित विषयांची चाचणी होणार आहे. या चाचणीसाठी विद्यार्थ्यांनी कोणताही अभ्यास करणे अपेक्षित नाही. विद्या परिषदेकडून या चाचण्यांसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली. जिल्हास्तरावरून या प्रश्नपत्रिकांचे शाळांमध्ये वाटप करण्यात आले आहे. शाळांकडे या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका सुपूर्त केल्यानंतर काही शाळांमधून परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे उजेडात आले आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर ५ वी, ८ वी या इयत्तांच्या प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. चाचणी परीक्षेचे पेपर फुटल्याच्या चर्चेमुळे पालक धास्तावून गेले होते. मात्र या चाचण्यांच्या निकालाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ विद्यार्थ्यांनी किती भाषिक आणि गणिती कौशल्ये आत्मसात केली आहेत, याची तपासणी यामधून केली जाणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षात (२०१६-१७) आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जुलै २०१६ मध्ये पहिली चाचणी घेतली गेली. त्यानंतर आॅक्टोबर २०१६ मध्ये दुसरी चाचणी पार पडली. आता तिसरी चाचणी एप्रिल महिन्यात ६ व ७ तारखेला घेतली जात आहे.
(प्रतिनिधी)
>कारवाईच्या भीतीने शिक्षकांनी
अगोदरच दिले पेपर
प्राथमिक शाळेतील १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन चाचण्यांच्या निकालातून विद्यार्थ्यांनी किती भाषिक व गणिती कौशल्ये आत्मसात केली आहेत, हे समजणार आहे. एकाच वर्गातील खूप विद्यार्थी या चाचण्यांमध्ये मागे पडल्याचे दिसून आल्यास संबंधित शिक्षकांना त्यांच्या शिकविण्यात योग्य त्या सुधारणा करण्यास सांगितले जाणार आहे. मात्र, दोन वर्षे शिक्षकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तरीही कारवाईच्या भीतीने काही शिक्षकांनी अगोदरच विद्यार्थ्यांना पेपर दिल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
>पालकही नाहक धास्तावले
मूल्यमापन चाचण्यांच्या निकालाचा कोणताही परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार नाही. मात्र पेपर फुटल्याच्या चर्चेने अनेक पालक धास्तावून गेल्याचे दिसून आले. चाचण्यांच्या निष्कर्षांवरून शिक्षकांनी त्यांच्या शिकविण्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे.
पेपरफुटीचा काहीही फायदा नाही
शाळांमधून प्राथमिक विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन चाचण्यांचे पेपर फुटले असले तरी त्याचा विद्यार्थ्यांना काहीही फायदा होणार नाही. या चाचणीमधून कौशल्ये तपासणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेत बेरजा, वजाबाक्या व प्रात्याक्षिक करून दाखवायचे असल्याने पेपर फुटला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र अधिकृत प्रतिक्रिया देण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाही.

Web Title: Examination papers of primary students broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.