परीक्षा प्रक्रियेतील चुका भोवणार!
By Admin | Published: September 22, 2015 01:40 AM2015-09-22T01:40:43+5:302015-09-22T01:40:43+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेत निष्काळजीपणा व चुका आढळून आल्यास दोषी प्राचार्य, प्राध्यापकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेत निष्काळजीपणा व चुका आढळून आल्यास दोषी प्राचार्य, प्राध्यापकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कुलगुरू मोहन खेडकर यांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. परीक्षा विभागाद्वारे तयार केलेल्या दंडात्मक कारवाईच्या या अहवालाला परीक्षा मंडळाने मान्यता दिली होती.
विद्यापीठांतर्गत पाच जिल्ह्यांत ४१६ महाविद्यालये असून, दरवर्षी सुमारे ४ लाख विद्यार्थी विविध शाखांतर्गत परीक्षा देतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे सेट तयार करण्यापासून मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन व निकालाच्या प्रक्रियेपर्यंतची अनेक कामे विद्यापीठस्तरावर केली जातात. अनेकदा या कामांमध्ये निष्काळजीपणा व चुका आढळून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर मोठा प्रभाव पडतो. अशा चुका व निष्काळजीपणाबाबत आजवर विद्यापीठाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार दंडात्मक कारवाईसह महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४चे कलम ३२नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.