परीक्षा सर्पमित्रांची

By Admin | Published: March 5, 2017 01:58 AM2017-03-05T01:58:25+5:302017-03-05T01:58:25+5:30

गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण राज्यात सर्पमित्रांचे अमाप पीक आले आहे. मुंबई त्याला अपवाद नाही. मागील महिन्यात चार सर्पमित्रांचे साप चावून मृत्यू झाले, ही चिंतेची बाब आहे.

Examination of Sarpamitra | परीक्षा सर्पमित्रांची

परीक्षा सर्पमित्रांची

googlenewsNext

- विजय अवसरे 

गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण राज्यात सर्पमित्रांचे अमाप पीक आले आहे. मुंबई त्याला अपवाद नाही. मागील महिन्यात चार सर्पमित्रांचे साप चावून मृत्यू झाले, ही चिंतेची बाब आहे. यापुढेही अशा घटना वारंवार घडत राहण्याची भीती आहे. कारण साप कमी आणि सर्पमित्र अधिक झाले आहेत. मुंबई व राज्यात किती सर्पमित्र आहेत, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. सहा वर्षांपूर्वी ठाणे वन्यजीव विभागाने केवळ १४ जणांना साप पकडण्याचे ओळखपत्र दिले होते. दोन वर्षांपूर्वी ठाणे वन्यजीव विभाग व काही ज्येष्ठ सर्पमित्रांनी मिळून सर्पमित्रांची तोंडी व प्रात्यक्षिकासह परीक्षा घेतली होती. त्यात २00 सर्पमित्रांपैकी फक्त ३५ जण उत्तीर्ण झाले होते. त्यांनासुद्धा नवीन ओळखपत्र देण्यात आले नाही. तरीपण सर्पमित्र साप पकडतच आहेत. मुंबईत किमान हजार स्वयंघोषित सर्पमित्र असतील. यातील किती जणांनी साप पकडण्याचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले आहे? कधी घेतले? कोणाकडे? का घेतले? नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी चॅनेल बघून व एकमेकांचे बघून साप पकडायला शिकले, हा शोधाचा विषय आहे.

ए कूण सर्पमित्रांपैकी ९0 टक्के सर्पमित्र अनधिकृत आहेत. यातील बऱ्याच सर्पमित्रांच्या गँग (संस्था) आहेत. ते आपापल्या संस्थेचे बॅच लावून, टी-शर्ट घालून संघटितपणे कॉल अटेंड करतात. नागरी वस्तीत आलेले साप पकडतात. प्रत्येकाने आपापली हद्द ठरवली आहे. चुकून जरी दुसऱ्याच्या हद्दीत साप पकडायला गेले की इगो दुखावतो. ‘मला कॉल आला नाही. पण मी अथवा आमची गँगच साप पकडणार,’ असे बजावले जाते. मग सर्पमित्रांची आपापसात भांडणे आणि मारामाऱ्या होतात. त्याचवेळी साप पळून जातो आणि नागरिकांचा जीव धोक्यात राहतो.
या सर्व स्वयंघोषित आणि अनधिकृत सर्पमित्रांना वन्यजीव विभागाने, पोलिसांनी किंवा महापालिकेने सांगितलेले नाही की, तुम्ही जाऊन साप पकडा. जर एखादा गंभीर प्रसंग उद्भवला, सर्पमित्र दगावला तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे. फक्त चमकण्यासाठी व आपले नाव मोठे करण्यासाठी सर्पमित्र सापांचा व आपला जीव धोक्यात घालत असतात. कॉलवर पकडलेला साप २४ तासांच्या आत वन्य अधिकाऱ्यासमोर सोडला पाहिजे, असा नियम आहे. कोणत्याही राष्ट्रीय उद्यानात किंवा अभयारण्यात सोडू नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मग मुंबईतील सर्पमित्र पकडलेले साप कोठे सोडतात, त्यांचे पुढे काय होते?
पकडलेला साप जंगलात न सोडता वन अधिकाऱ्यांना न सांगता घरात ठेवून त्यांची छायाचित्रे काढली जातात. सेल्फी काढला जातो. सापाला हातात धरून, गळ्यात घालून, नागाला समोरून किस करताना, नागाची शेपटी तोंडात धरून नागाला बाइकवर ठेवून अथवा अजगराला गळ्यात घालून ही छायाचित्रे काढली जातात. यात सर्पमैत्रिणी पण आहेत. विषारी नाग, घोणस यांना हाताळताना, सर्पदंश झाल्यानंतरच्या जखमा, जमिनीवर राहणाऱ्या सापाला झाडावर तर झाडावर राहणाऱ्या सापाला दगडावर ठेवून छायाचित्रे काढली जातात. अशी छायाचित्रे फेसबुकवर आहेत. या सर्व प्रकारांत सापांचे प्रचंड हाल होतात.
असे सापांचे हाल करणारे सर्पमित्र समाजाला नको आहेत. या प्रकरणी बऱ्याच प्रसिद्धीलोलुप सर्पमित्रांची चौकशी ठाणे वन्यजीव विभागाने केली आहे. सुमारे पाचशे चमकेश सर्पमित्रांची सापांसह छायाचित्रे असलेली यादी तयार असून लवकरच त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
मात्र त्याचवेळी काही सर्पमित्र आणि त्यांच्या संस्था चांगले काम करीत असून त्यांना त्यांच्या कामाचा चांगला अनुभव आहे. त्यांना सापांचा व नागरिकांचा जीव वाचवण्याची तळमळ आहे. खरे तर सर्पमित्र अधिकृत असो की अनधिकृत. तो आपला जीव धोक्यात घालून सापांचा व नागरिकांचा जीव वाचवतो. अशा सर्पमित्रांना सापाला सुरक्षितपणे हाताळण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे अग्निशमन दलाला सायरन देण्यात आला आहे त्याचप्रमाणे सर्पमित्रांच्या गाडीला व बाइकला सायरन देण्यात यावा. कॉलवर असताना, साप पकडताना काही अपघात झाल्यास सर्पमित्रांसाठी विमा योजना असावी. सर्पमित्रांना सर्पदंश झाल्यास मोफत उपचार देण्यात यावेत. साप पकडण्यासाठी त्यांना आधुनिक उपकरणे देण्यात यावीत. पकडलेल्या प्रत्येक सापामागे त्यांना त्याचे मानधन देण्यात यावे.
सर्पमित्र हे सरकार आणि प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी विभागानुसार सर्पमित्रांच्या नेमणुका करण्यात याव्यात. काही वेळा सर्पमित्रांनी सापाला वाचवण्यासाठी आपले आयुष्य या कामासाठी वाहिले आहे. त्यांना योग्य ते मानधन सरकारकडून मिळणे गरजेचे आहे. सापांबद्दल ज्यांना खरेच आत्मीयता आहे; त्यांनी सर्पमित्र जरूर बनावे. पण याअगोदर याबाबतचे प्रशिक्षणही घ्यावे. शिवाय कायद्याच्या चौकटीत राहून साप पकडावेत. हे काम करताना अतिउत्साहीपणा करू नये. सर्पमित्रांनी साप हा पाळीव प्राणी नाही हे लक्षात ठेवावे.

सापांविषयीचे कायदे
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कलम ५ आणि कलम ९ अंतर्गत सापांना संरक्षण देण्यात आले आहे. साप पाळणे, पकडणे, सापांसोबत सेल्फी काढणे, साप व इतर वन्यजिवांसोबतचे फोटो फेसबुकवर टाकणे, स्नेक शो करणे हा गुन्हा आहे. संबंधितांवर कडक कारवाई होऊ शकते.
वन्यजीव अधीक्षकांच्या कडक धोरणामुळे ज्या गारुडी समाजावर अन्याय झाला आहे; त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. त्यांचा पारंपरिक पिढीजात व्यवसाय बंद झाला आहे. अशा गारुडी समाजातील काही तरुणांना सर्पमित्रांचा परवाना व ओळखपत्र शासनाने द्यावे. त्यामुळे तेही समाज प्रवाहात येतील आणि शहरी गारुडी (सर्पमित्र) यांच्यापेक्षा जास्त चांगले काम करतील. शिवाय सापांचा जीव वाचवतील. कारण ते पिढीजात गारुडी आहेत. त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता नाही.

नागरिकांना आपल्या घरात, आजूबाजूस साप दिसल्यास घाबरू नये. वनविभागाला फोन करावा. ते अधिकृत सर्पमित्रांचा दूरध्वनी क्रमांक देतील. सर्पमित्रांना पाठवतील. काही कारणास्तव उशीर झाल्यास इतर सर्पमित्र पोहोचतील. त्यांना साप पकडू द्यावा. साप पकडल्यानंतर सर्पमित्राचे नाव, पत्ता, संस्थेचे नाव, दूरध्वनी क्रमांक घेण्यास विसरू नये आणि ही माहिती न विसरता वनविभागाच्या कंट्रोल रूमला कळवावी. त्यामुळे अनधिकृत सर्पमित्र पकडले जातील.

तुमच्या घराच्या आसपास कोणी साप, कासव, पोपट, घुबड, घार व इतर वन्यजीव पाळत असल्यास त्यांची माहिती पोलिसांना, वनविभागाला जरूर कळवा. तुमचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
वनविभाग : ठाणे नियंत्रण कक्ष (०२२२५४४२११९)

(लेखक निसर्गमित्र आणि वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोचे स्वयंसेवक आहेत.)

Web Title: Examination of Sarpamitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.