‘फर्ग्युसन’ला एक्सलन्स दर्जा
By Admin | Published: March 4, 2017 12:53 AM2017-03-04T00:53:12+5:302017-03-04T00:53:12+5:30
फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने पाच वर्षांसाठी ‘कॉलेज आॅफ एक्सलन्स’ (सीई ) हा दर्जा जाहीर केला आहे
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने पाच वर्षांसाठी ‘कॉलेज आॅफ एक्सलन्स’ (सीई ) हा दर्जा जाहीर केला आहे. त्यामुळे आयोगाकडून महाविद्यालयाला दोन कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दि. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी हा दर्जा असेल.
महाविद्यालयाला ३.६२ गुणांसह नॅकची ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. तसेच गेल्या वर्षी आयोगाने स्वायत्त दर्जा दिला आहे. प्रयोगशाळांचे सक्षमीकरण, भाषेच्या प्रयोगशाळेत आवश्यक उपकरणे, अध्यापनाला मदत, स्वयंचलित ग्रंथालये, संगणक व पुस्तक खरेदी अशा विविध कामांसाठी आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा वापर केला जाणार आहे.
उच्च दर्जाच्या संशोधनासह महाविद्यालयात विविध अभिनव कार्यक्रम सुरू असल्याचे निरीक्षण विद्यापीठ अनुदान समितीने नोंदविले आहे. यानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
(प्रतिनिधी)