दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना मनोहर कदमचे प्रशिक्षण
By admin | Published: June 19, 2016 05:03 AM2016-06-19T05:03:14+5:302016-06-19T05:03:14+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना माजी पोलीस अधिकारी मनोहर कदम याने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा धक्कादायक संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. कदम याने पोलीस
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना माजी पोलीस अधिकारी मनोहर कदम याने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा धक्कादायक संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. कदम याने पोलीस उपनिरीक्षक असताना १९९७ मध्ये घाटकोपरच्या रमाबाई नगरात उसळलेल्या दंगलीवेळी जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात त्याला जन्मठेपही झाली होती.
या प्रकरणातील संशयित सारंग अकोलकर याने केलेल्या एका ई-मेलमध्ये त्याच्या नावासह उल्लेख केला असल्याने त्यानेच या मारेकऱ्यांना प्रशिक्षण दिले होते, असा सीबीआयचा संशय आहे़
सीबीआयने १ जून रोजी सारंग अकोलकर याच्या शनिवार पेठेतील घरावर छापा घातला होता़ त्या वेळी घेतलेल्या झडतीत सीबीआयच्या हाती दोन ई-मेलची कागदपत्रे मिळाली होती़ पहिल्या ई-मेलमध्ये १५ हजार सेना उभारणे तसेच जत, फोंडा येथे प्रशिक्षण शिबिर याविषयीची माहिती दिली होती़ दुसऱ्या ई-मेलमध्ये मनोहर कदम याचा उल्लेख आहे़ त्यात त्याच्या दोन मोबाइल क्रमांकाचाही उल्लेख आहे़ मात्र, ज्या ई-मेलमध्ये सारंग अकोलकर याने त्याचा उल्लेख केला आहे, तो ई-मेल कधी केला होता़ त्यात नेमका काय उल्लेख आहे, त्यानंतर आणखी काही ई-मेलमध्ये त्यांचा उल्लेख आहे का, हे अद्याप उघड झालेले नाही़ राज्य राखीव दलाचा (एसआरपीएफ) निवृत्त पोलीस उपनिरीक्षक कदम याला रमाबाई नगरातील गोळीबार प्रकरणी २००९ मध्ये सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र त्यानंतर मुंबई हायकोर्टाने ही शिक्षा स्थगित करून मे २००९ मध्ये त्याला जामीन मंजूर केला होता. हाच कदम आता दाभोलकर हत्येशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून पुन्हा चर्चेत आला आहे. (प्रतिनिधी)
तीन अधिकारी रडारवर
या प्रकरणी सीबीआय दोन निवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करत आहे़ सध्या सेवेत असलेल्या एका अधिकाऱ्याने सनातनवर काय कारवाई सुरू आहे, याची माहिती सनातनला दिल्याचा संशय सीबीआयच्या अधिकाऱ्यांना असून त्या दृष्टीनेही तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे़