सर्वपित्रीला सूर्योदय तिथीचा अपवाद
By admin | Published: September 15, 2014 04:11 AM2014-09-15T04:11:13+5:302014-09-15T04:11:13+5:30
यंदा पंचांग, दिनदर्शिकेत मंगळवार २३ रोजी सकाळी ९.४५ पर्यंत चतुर्दशी तिथी आहे आणि सर्वपित्री श्राद्ध मंगळवारी असेल. तसेच बुधवार २४ ला सकाळी ११.४४ पर्यंत अमावस्या
सुहास शूर, जामदा (जि. जळगाव)
यंदा पंचांग, दिनदर्शिकेत मंगळवार २३ रोजी सकाळी ९.४५ पर्यंत चतुर्दशी तिथी आहे आणि सर्वपित्री श्राद्ध मंगळवारी असेल. तसेच बुधवार २४ ला सकाळी ११.४४ पर्यंत अमावस्या असूनही आजेपाडवा किंवा मातामह श्राद्ध सांगितले आहे. याबाबत संभ्रम असला तरी त्याच दिवशी ती श्राद्ध करणे योग्य ठरणार असल्याचे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे.
साधारणत: धार्मिक कार्यास सूर्योदय कालीन तिथी मुख्यत्वे मानली जाते. परंतु श्राद्धतिथीचा निर्णय सूर्योदयकालीन तिथीवर नसून श्राद्ध कर्मासाठी श्राद्धाची तिथी अपराण्हकाली म्हणजे सामान्यत: दुपारी दीड ते चार या काळात ज्यादिवशी असेल त्या दिवशी सकाळी श्राद्ध तिथी नसताना सुद्धा सकाळपासून दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत कोणत्याहीवेळी श्राद्धकर्म करता येते. या शास्त्रनिर्णयास अनुसरुन आहे, असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार मंगळवारी अपराण्हकाली अमावस्या असल्याने सर्वपित्री श्राद्ध करणे योग्य व संयुक्तिक ठरेल. दुसऱ्या दिवशी अपराण्ह काली प्रतिपदा तिथी असल्याने ‘आजेपाडवा’ (म्हणजे वडील हयात असलेल्या मुलाने आईच्या वडिलांचे श्राद्ध करणे -मातामह श्राद्ध ) २४ सप्टेंबरला करणे योग्य राहील. दुर्गास्थापना, नवरात्रारंभ यासाठी सूर्योदयकालीन तिथी मुख्यत्वे मान्य असल्याने २५ ला सूर्योदयापासून दुपारी १.२२ पर्यंत प्रतिपदा तिथी असल्याने दुर्गास्थापना, नवरात्रारंभ २५ सप्टेंबर गुरुवार रोजी दिवसभरासाठी आहे. क्वचित प्रसंगी दुसऱ्या दिवशी सूर्योदयास द्वितीया तिथी असल्यास अमावस्था समाप्तीनंतर उशीरा घटस्थापना होते. पंचांगातील तिथी निर्णय दैवी, धार्मिक, शुभकार्यास वेगळे व श्राद्धादी कर्मास वेगळे नियम आहेत, असेही पंचांगकर्त्यांनी सांगितले.