चिनी वस्तूंवर ‘उल्हासनगर’ पॅटर्नचा उतारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:43 AM2020-06-21T02:43:38+5:302020-06-21T02:43:45+5:30
‘उल्हासनगर मेड’ वस्तू चिनी वस्तूंवर मात करून ड्रॅगनला टक्कर देतील, असा येथील व्यापाऱ्यांचा दावा आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : स्वस्त वस्तूंची निर्मिती करून मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेच्या आर्थिक नाड्या ताब्यात घेणाऱ्या चीनवर ‘उल्हासनगर’ पॅटर्नने मात करता येऊ शकते, असा दावा येथील व्यापारी करीत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, खेळणी, फर्निचर, स्कूल बॅग्ज अशा सर्वच चिनी वस्तूंशी उल्हासनगरच्या स्थानिक बाजारात तयार केलेल्या वस्तू केवळ सामना करीत नाहीत, तर काहीअंशी मातही करीत आहेत.
आजही उल्हासनगरात ब्रँडेड वस्तूंसारख्याच वस्तू बनविल्या जात असून, या कारखान्यांना शासनाने अधिकृत मंजुरी व साह्य दिल्यास देशभर ‘उल्हासनगर मेड’ वस्तू चिनी वस्तूंवर मात करून ड्रॅगनला टक्कर देतील, असा येथील व्यापाऱ्यांचा दावा आहे. उल्हासनगरात इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, स्कूल बॅग, रेडिमेड कपडे, जिन्स आदींचे मोठे मार्केट आहे. यापूर्वी येथून विविध वस्तूंचा राज्यातच नव्हे तर देशभर पुरवठा होत होता. सुरुवातीला चिनी वस्तूंनी ग्राहकांमध्ये आकर्षण निर्माण केले. मात्र कालांतराने त्या तकलादू असल्याचे लक्षात आल्यावर ग्राहकांनी तशाच स्वस्त असलेल्या उल्हासनगर मेड वस्तूंचा पर्याय स्वीकारला, अशी माहिती उल्हासनगर व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक छतवाणी व इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिक मार्केट संघटनेचे अध्यक्ष नरेश थारवानी यांनी दिली.
कॅम्प नं.-३ परिसरातील १७ सेक्शन ते शिवाजी चौक परिसरातील टिल्सन मार्केट, मारोती चेंबर, न्यू मार्केट आदी ठिकाणी ७०० पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक दुकाने आहेत. तसेच पवई चौक, हिराघाट परिसरात स्कूल बॅगचे मोठे मार्केट असून, देशभर येथून बॅगचा पुरवठा होतो. जीन्स पँटची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या या शहरात जीन्सच्या चेन, बटण आदी साहित्यही बनविले जाते. यासोबतच मोटारींचे विविध पार्टही येथे मिळतात.
उद्याच्या अंकात / कापड व एरंडी तेल प्रक्रिया उद्योगात भारताला मोठी संधी
>फर्निचर मार्केट देशात प्रसिद्ध
महिलांची सौंदर्यप्रसाधने, बांगड्या, केसाच्या विविध पिना, मुलांची खेळणी, विविध चॉकलेट, खाण्याच्या वस्तू आदी अनेक साहित्य येथे बनविले जाते. शहरातील फर्निचर मार्केट देशात प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्येही चिनी वस्तूंनी शिरकाव केला होता. चिनी फर्निचर आकर्षक, कमी किमतीचे असले तरी टिकाऊ नसल्याने त्याकडे नागरिकांनी कालांतराने पाठ फिरविल्याची माहिती यूटीए संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्र वर्ती यांनी दिली.
>मेड इन उल्हासनगर
उल्हासनगरशी जोडलेला हा पॅटर्न अनेक वर्षांपासून म्हणजे अगदी चीनने वेगवेगळ्या बाजारपेठांवर कब्जा करण्यापूर्वीपासून प्रचलित आहे. जेव्हा विदेशी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध होते; विदेशी कपडे, घड्याळे आदी वस्तू सहज मिळत नव्हत्या आणि त्यांचे स्मगलिंग होत होते, तेव्हा ‘मेड इन उल्हासनगर’ या पॅटर्नने हुबेहुब विदेशी वस्तूंसारख्या दिसणाºया वस्तू बाजारात आणल्या होत्या.