अस्मानी संकटावर आश्वासनांचा उतारा
By admin | Published: July 2, 2014 04:25 AM2014-07-02T04:25:09+5:302014-07-02T04:25:09+5:30
राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीचे संकट असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून आश्वासनांचा पाऊस पदरात पाडून घेतला
नवी दिल्ली : राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीचे संकट असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून आश्वासनांचा पाऊस पदरात पाडून घेतला. या आश्वासनांचा पाऊस नुसताच गरजणार की बरसणार हे अथर्संकल्पीय अधिवेशनात स्पष्ट होईल.
भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभा व परिषदेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, खासदार हंसराज अहिर, संजयकाका पाटील, पाशा पटेल यांनी ही भेट घेतली. पावसाळा लांबल्याने शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात फार झालेली नसली तरी २० टक्के पेरणी झाली. त्या शेतकऱ्यांना मदतीचा कसा हात देता येईल याबाबत चर्चा झाली. आपत्कालीन आराखडा तयार होत असल्याचे सिंह यांनी शिष्टमंडळास सांगितले.
फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले, की विदर्भात केंद्रीय कृषी विद्यापीठ, ठाणे, यवतमाळ, जालना यवतमाळ, नाशिक, सांगली व नागपूर येथे अतिरिक्त कृषी विज्ञान केंद्र, देशातील ६० टक्के केळीते उत्पादन उत्तर महाराष्ट्रातील बागांमध्ये होते, तेथील बागायतदारांना कमी दरात टिश्यू कल्चर उपलब्ध व्हावे यासाठी जळगाव येथे केळी सशोधन केंद्र व टिश्यू लॅब, नागपूरच्या आयसीसीआर या संस्थेला इंस्टीट्यूटचा दर्जा, पुणे येथे ई- अॅग्री एक्सटेंशन सर्व्हीसेस, अदमदनगर येथे बायोटेक्नॉलॉजी कल्चरचे उत्पादन, नाशिक येथे फलोत्पादन प्रक्रिया केंद्र, बुलडाण्यात लघुबीज प्रसंस्करण संस्था अशा मागण्या आम्ही केल्या आहेत. त्या त्यांनी स्वीकारल्याचे फडणवीस म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)