एटीएममधून निघाल्या जास्तीच्या नोटा
By admin | Published: January 25, 2017 03:23 AM2017-01-25T03:23:39+5:302017-01-25T03:23:39+5:30
शहरातील बँक आॅफ बडोदाच्या एका एटीएममधून कमी पैशाचे विड्रॉल असतानाही जास्तीच्या नोटा ग्राहकांना मिळाल्याचा प्रकार
तुमसर (भंडारा) : शहरातील बँक आॅफ बडोदाच्या एका एटीएममधून कमी पैशाचे विड्रॉल असतानाही जास्तीच्या नोटा ग्राहकांना मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला. पैसे काढल्यानंतर स्लिपमध्ये जादा पैशांची नोंद झालेली नाही. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार झाल्याचा खुलासा बँकेने केला आहे.
या एटीएममधून ज्यांनी पैसे काढले, त्यांना १०० रुपयांऐवजी ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्या. हा प्रकार दुपारपासून सुरू होता. यामुळे चार लाख रुपयांच्या नोटा जास्त वितरित झाल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली. ज्यांनी चार हजार रुपये हवे होते, त्यांना ५०० च्या ४० नोटा ,ज्यांना तीन हजार हवे होते त्यांना ५०० रूपयांच्या ३० नोटा मिळाल्या. परंतु एटीएममधून मिळणाऱ्या स्लिपमध्ये जेवढे पैसे हवे तेवढेच नोंद झाले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुपारनंतर बँकेने ग्राहकांशी संपर्क करून, ‘तुम्ही जास्त रक्कम काढली असून आपण व्यवस्थापकांना भेटण्यासाठी या,’ असा निरोप दिला. काहींनी जास्तीची रक्कम बँकेत जमा केली तर काहींनी कोणत्या आधारावर जास्तीची रक्कम जमा करायची, असा प्रतिप्रश्न केला. (प्रतिनिधी)