अतिवृष्टीने पिके नेस्तनाबूत तर शेतकरी हवालदिल; आतापर्यंत ५ जणांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 02:10 AM2020-10-17T02:10:11+5:302020-10-17T07:34:58+5:30
५ शेतकऱ्यांची आत्महत्या, मराठवाड्यात तीन : विदर्भातील दोघांचा समावेश
मुंबई : नापिकी व अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कपाशी आदी नगदी पिके नेस्तनाबूत झाल्याने तसेच नापिकीमुळे विदर्भात दोघा तरुण शेतकऱ्यांनी तर मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले.
धामणगावात दोघांनी संपविले जीवन
धामणगाव रेल्वे (अमरावती) : दोन वर्षांपासून नापिकीचा सामना केल्यानंतर यंदा हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पिक अतिवृष्टीने नेस्तनाबूत झाल्याने आलेल्या निराशेपोटी दोन युवा शेतकºयांनी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बोरगाव निस्ताने व उसळगव्हाण येथे घडली. प्रीतम भास्करराव ठाकरे (३०, रा. बोरगाव निस्ताने) व दीपक प्रमोद डफळे (२५, उसळगव्हाण), अशी मृतांची नावे आहेत. ठाकरे यांच्या शेतात पाणी साचल्याने कपाशी पीक पिवळे पडले. शेतीकर्ज कसे फे डायचे, या विवंचनेत त्यांनी घरी गळफास घेतला. तर डफळे यांनी विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रेचा अंत केला.
लातुरात दोघांनी केला अंत
वाढवणा बु़ (जि़ लातूर) : निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील परमेश्वर नागनाथ बिरादार (वय ३४) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. अतिवृष्टीने सोयाबीन खराब झाल्याने नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. तर सततच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त झालेल्या ६८ वर्षीय शेतकºयाने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. गोपिनाथ ग्यानोबा मद्देवाड (रा़ वाढवणा खु़, ता़ उदगीर) असे त्यांचे नाव आहे़
हिंगोलीत तरुणाने घेतले विष
सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील लिंबाळा तांडा येथील ३२ वर्षीय तरूणाने अतिवृष्टीच्या नैराश्यातून आत्महत्या केली. विजय बन्सी आडे (वय ३२) असे त्याचे नाव आहे. विजय आडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. या नैराश्यात बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी विष प्राशन केले, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.