उत्पादन शुल्कची ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये धाड; देशी-विदेशी मद्यासह 5 लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: July 12, 2017 10:02 PM2017-07-12T22:02:21+5:302017-07-12T22:02:21+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ आणि ठाणे पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकून मंगळवारी आणि बुधवारी अशा दोन दिवसांमध्ये देशी
आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 12 - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ आणि ठाणे पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकून मंगळवारी आणि बुधवारी अशा दोन दिवसांमध्ये देशी विदेशी मद्यासह पाच लाख १५ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांच्या पथकाने बुधवारी उल्हासनगर कॅम्प नं. पाच सहयाद्रीनगर येथील अय्यपा मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या गावठी दारु निर्मितीच्या अड्डयावर धाड टाकली. याठिकाणाहून सुमारे नऊ हजार लीटर दारु निर्मितीचे रसायन आणि इतर सामुग्री असा तीन लाख आठ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर अंबरनाथ विभागातही लाड यांच्या पथकाने बदलापूर विभागातील वडवली गावात दोन वेगवेगळया ठिकाणी धाडी टाकून एका ्रस्कूटरसह ४० लीटर गावठी दारु असा ३२ हजार ७० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अंबरनाथ विभागाने ११ जुलै रोजी वसारगावात चार वेगवेगळया दारु अड्डयांवर धाडी टाकून सात हजार ७०० लीटर रसायन, १५० किलो काळा गुळ आणि ४० लीटर गावठी दारु असा एक लाख ७४ हजार ९८० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील दारु अड्डा चालविणारे मात्र या पथकाला हुलकावणी देऊन पसार झाले. तर ठाण्याच्या सी विभागाचे निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या पथकाने कासारवडवली आणि काशीमीरा भागात देशी दारुची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या दोघांना मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ६१ लीटर मद्यासह सुमारे अडीच हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.