मोर्शीत अंधारावर उजेडाच्या विजयाची ‘धेंडाई’ उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 06:18 AM2020-11-16T06:18:35+5:302020-11-16T06:18:51+5:30
अमरावतीपासून मोर्शी हे गाव ६० किमी अंतरावर आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सावंगा येथून ‘धेंडाई’ काढण्यास सुरुवात झाली.
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी (जि. अमरावती) : सुमारे चारशे वर्षांचा इतिहास असलेली ‘धेंडाई’ मोर्शी शहरात शनिवारी रात्री अमाप उत्साहात आणि शेकडोंच्या उपस्थितीत काढण्यात आली. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर रात्री ‘धेंडाई’ काढली जाते. मोर्शी शहरातच नव्हे, तर अख्ख्या अमरावती जिल्ह्यात ‘धेंडाई’ची चर्चा होते.
अमरावतीपासून मोर्शी हे गाव ६० किमी अंतरावर आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सावंगा येथून ‘धेंडाई’ काढण्यास सुरुवात झाली. सृष्टीची निर्मिती ही अग्निदिव्यातून झाली आहे. अंधारावर विजय प्राप्त करण्यासाठी उजेडाची, प्रकाशाची गरज असते. प्रकाशाला लक्ष्मीचे रूपही मानले जाते. म्हणूनच दिवाळीच्या रात्री दिव्यांची आरास मांडून त्याची पूजा केली जाते. घरोघरी ही दिव्यांची धेंडाई फिरवून अंधारावर, अज्ञानावर, गरिबीवर मात व्हावी, अशी कामना केली जाते. पूर्वी ‘धेंडाई’ गावागावातून काढली जायची. कालांतराने बऱ्याच गावात ती बंद पडली. मात्र, मोर्शीकरांनी हा पारंपरिक ठेवा आजही जतन करून ठेवला आहे. मोर्शीमध्ये ‘धेंडाई’ची गाणी म्हणायला बुधवारपासूनच सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनाच्या रात्रीपर्यंत गाणी गायली गेली. काही दिवसांनंतर स्नेहभोजनाने ‘धेंडाई’ची समाप्ती होणार आहे.
अशी असते ‘धेंडाई’
‘धेंडाई’ म्हणजे लाकडापासून बनविलेली कलाकृती. तिचा आकार एखाद्या पालखीप्रमाणे असतो.
दोन माणसांना उचलता येईल, अशी समोर व मागे काठ्यांची व्यवस्था असते. ‘धेंडाई’मध्ये एकूण ८५ दिवे लावलेले असतात. ‘धेंडाई’सोबत परिसरातील शेकडो लोक फिरतात.
सगळी गाणी मुखोद्गत
लोक रात्रभर पारंपरिक चालीत ‘धेंडाई’ची गाणी म्हणतात. गाण्यांमध्ये प्रामुख्याने गायीची स्तुतीसुमने असतात. तसेच कृष्णलीलेचाही समावेश असतो.
ही गाणी कोठेही लिखित स्वरूपात संग्रहित केलेली नाहीत, तर चारशे वर्षांपासून शेकडो पिढ्यांनी ती मुखोद्गत करून ठेवली आहेत.