परीक्षा अर्जात 'हिंदू' शब्द का नाही ? शिक्षण मंडळाने दिले 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 07:04 PM2020-12-03T19:04:22+5:302020-12-03T19:06:15+5:30
परीक्षा अर्जामध्ये हिंदु शब्द वगळल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जामध्ये २०१४ पासूनच मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन यासाठी ‘मायनॉरिटी रिलीजन’ व इतर सर्व घटकांसाठी ‘नॉन मायनॉरिटी’ असे रकाने समाविष्ट करण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहे. ही माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमुद करण्यात येत नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
परीक्षा अर्जामध्ये हिंदु शब्द वगळल्याच्या बातम्या प्रसिध्द होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मंडळाने हा खुलासा केला आहे. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जातील मायनॉरिटी रिलीजन या रकान्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन या उपरकान्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व घटकांसाठी नॉन मायनॉरिटी हा रकाना २०१४ पासून समाविष्ट आहे. तेव्हापासूनच प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या परीक्षा अर्जामध्ये भरून घेण्यात येते.
केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय व राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने २०१३ मधये स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाकडे मागितली होती. त्यानुसार मंडळाच्या परीक्षा समितीच्या ठरावाने परीक्षा अर्जामध्ये उपरकान्यांचा समावेश करण्यात आले. मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन हे अल्पसंख्यांक समुपदाय राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार अर्जामध्ये घेण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना माहिती भरण्यासाठी नॉन मायनॉरिटी हा रकाना उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
------------------------