Exclusive: ...म्हणून शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवावी; सांगताहेत धनंजय मुंडे
By राजा माने | Published: February 13, 2019 05:16 PM2019-02-13T17:16:58+5:302019-02-13T17:17:55+5:30
२०१४च्या निवडणुकीआधी पवारांनी स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा लढवावी का, यावरून मतमतांतरं आहेत.
- राजा माने
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील वजनदार नेते, मोदी सरकारच्या विरोधात महाआघाडीची मोट बांधणारे महागुरू शरद पवार स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थात, 'माढामधून लढण्याच्या नेत्यांच्या आग्रहाबाबत मी विचार करेन', असं सूचक विधान पवारांनीच केल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. २०१४च्या निवडणुकीआधी पवारांनी स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा लढवावी का, यावरून मतमतांतरं आहेत. परंतु, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत का उतरलं पाहिजे, याबाबतची राष्ट्रवादीची दुसऱ्या फळीची भूमिका आज पक्षाचे धडाकेबाज नेते धनंजय मुंडे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केली.
'माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेला मतदारसंघ आहे. शरद पवार याआधीही या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेत. आजही या मतदारसंघात अनेक प्रबळ उमेदवार आमच्याकडे आहेत. परंतु, शरद पवार यांनी स्वतः यावेळची निवडणूक लढवल्यास, ही लढाई आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, मतदाराला कळेल, स्वतः सेनापती रणांगणात उतरल्याचं पाहून मावळेही तुटून पडतील. या हेतूनेच अजित पवार, छगन भुजबळ जयंत पाटील, विजयसिंह आणि मी स्वतः पवारांना पुन्हा निवडणूक लढवण्याची गळ घातली', असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. शरद पवारांनी निवडणूक लढवल्यास मतदारांमध्ये १५ टक्क्यांचा स्विंग होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. नेता हा पक्ष चालवत असतो. धोरणं ठरवत असतो. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर काही गोष्टी त्याला मान्यही कराव्या लागतात, असं सूचित करतानाच, शरद पवारांनी अद्याप होकार दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी नमूद केलं.
शरद पवार यांना माढ्याच्या रिंगणात उतरवल्यास ते तिथेच बांधले जातील, हा समज सगळ्यांनीच डोक्यातून काढून टाकावा. कारण, त्यांनी माढ्यामध्ये प्रचार केला नाही, सभा घेतली नाही आणि देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या पहिल्या पाच खासदारांमध्ये शरद पवार असतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
गेल्या चार वर्षात विरोधी पक्ष म्हणून काम करताना, सामान्य माणसांच्या प्रश्नावर संघर्ष करून आम्ही गमावलेला विश्वास परत मिळवला आहे. त्या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरेल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
शरद पवारांची संपूर्ण मुलाखत...